Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अरे ए 'पावसा' बस कर ना आता तुझा हा खेळ.किती छळणार आहेस ,सगळीकडं स्मशान शांतता आहे रे,जो तो तुझ्या आगमनाकडं डोळे लावून बसलाय




पावसाला पत्र ..

..प्रिय मिञा..........!
आम्हाला माहीत आहे तू आमच्यावर रुसला आहेस,आमच्या अक्षम्य अशा चूका झाल्या आहेत,अरे पण तू लेकरं म्हणतोस ना आम्हाला मग लेकरं चुकली तर त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची असते का रे.आम्ही तुला कधी गांभीर्याने घेतलंच नाही रे,तू सहज यायचास,बागडायचास,वाडी वस्ती असो की सिमेंट काँक्रीट ची मोठं मोठी जंगल,तू कधी अजेदुजे पणा केला नाहीस,प्रत्येकासाठी तू सारखाच होतास.गरीबाच्या झोपडीत सुद्धा तू तितकाच आनंद द्यायचास अन राजमहालात सुद्धा तसाच खेळायचास.
मग अचानक मागच्या काही वर्षात तुझं कुठं बिनसलं हेच कळायला मार्ग नाही.दरवर्षी तू न चुकता हजेरी लावायचास. अंगाची लाही लाही करणारं ऊन जेव्हा होरपळून काढायचं तेव्हा आम्हाला तुझ्या आगमनाची आतुरता असायची.माग पुढं होईल पण तू जरूर जरूर येणार ही खात्री असायची आम्हाला .
अरे ए 'पावसा' बस कर ना आता तुझा हा शिवणापाणीचा खेळ.किती छळणार आहेस,सगळीकडं स्मशान शांतता आहे रे,जो तो तुझ्या आगमनाकडं डोळे लावून बसलाय .कधी एकदा येतोस अन आमचं शेत शिवार,अंगण,नद्या नाले,ओढे भिजवून टाकतोस अस झालंय आता .
अरे एवढी विनवणी आम्ही प्रत्यक्ष देवाला जरी केली असती तरी तो ही प्रसन्न होऊन आमच्यासमोर आला असता पण तू इतका निष्ठुर झालास की तुला पाझरच फुटेना झालाय .
आमच्या आजी आजोबांच्या काळात  मिरगाच्या सुरवातीलाच तू यायचास.अगदी तू आला म्हणजे मिरग सुरू झाला अस समीकरण झालं होतं .त्याकाळात तू धो धो बरसायचास,अगदी नंतर नंतर नको नको वाटायचास,पण तू आपला रतीब पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबायचा नाहीस .तो काळ आम्हाला आता पुसटसा आठवतो कारण पिढी बदलली की घडी बदलते अस म्हणतात तसाच तुही बदललास पण इतका बदलशील अस वाटलं नव्हतं रे .अगदी एखाद्यानं मोठ्या हौसेनं लव्ह मॅरेज करावं अन पहिल्याच रात्रीला ब्रेकअप व्हावं अस काहीस तुझं झालं आहे .आम्ही तुझ्या माग लागलोय,तुझी आतुरतेने वाट पाहतोय पण तू मात्र रुसलेल्या बायकोप्रमाणे फुरंगुटुन बसला आहेस .
अरे यार आमच्या चूका झाल्या ,आम्ही झाडं तोडली,जंगल नष्ट केली अन सिमेंट काँक्रीट ची जंगलं उभारली .आम्ही एवढे आपलपोटे झालो की तू यावं अस वातावरणच ठेवलं नाही .पूर्वी ज्या हिरव्यागार गालिचा वरून तू यायचास तो गालिचा नष्ट आम्हीच केलाय हे देखील आम्ही जाणतो पण चुकतो तो माणूसच ना .जे काहीच काम करत नाहीत त्यांच्याकडून चूका होणारच नाहीत .आम्ही चुकलो त्याबद्दल आम्हाला खूप लाज वाटते आहे,आम्ही आता शतकोटी वृक्षलागवड सुरू केली आहे,यातून किती झाडं लागतील अन जगतील हे तुलाही माहीत आहे पण काहीच नसल्यापेक्षा काहीतरी करीत आहोत ना रे, त्याला काही मार्क देणार की नाही तू ,गेल्या काही वर्षात औषधालासुद्धा झाडं दिसत नाहीत ही म्हण आमच्यामुळेच आणि आमच्या अप्पल पोटे पणा मुळंच रूढ झालीय याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे रे,पण म्हणून तू एवढा सूड उगवायचा हे बरं नव्ह रे .
जिथं जिथं म्हणून मोकळी जागा दिसेल तिथं तिथं आम्ही घर,दार,माड्या, इमारती उभारल्या,त्यामुळं तू आमच्यावर रुसलास .सरकार मग ते कोणतंही असो त्यातही माणसंच काम करतात ना ,त्यांनी आपलं पोट भरण्यासाठी विकासाच्या नावाखाली नद्या,नाले ,ओढे गिळंकृत केले.टेकड्या पोखरून काढल्या,जंगल भुईसपाट केली त्यामुळं व्हायचं तेच झालं अन तू आमच्यावर कोपलास. बरं तुला बोकड,कोंबड्या चा नेवैद्य दाखवावा म्हणलं तर तू त्यालासुद्धा तयार होईना .तुझं आपलं एकच,तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागलात ना आता "मेरी मर्जी "म्हणत तू दडून बसलास .
अरे मित्रा राग नको मानू पण अलीकडच्या इंग्रजाळलेल्या संस्कृतीनुसार आम्ही बापाला मित्र म्हणू लागलो आहोत त्या अधिकारातून तुला मित्र म्हणलो .तर मित्रा अडीअडचणीला मदतीला धावून येतो तोच खरा मित्र अस आम्ही पुस्तकात वाचलं होतं त्याला तरी जाग अन ये बाबा एकदाचा जोरात . पूर्वी कसा तू अगदी न चुकता ठरलेल्या वेळेला यायचास आता मात्र तू आवसा पुनवेला सुद्धा येशील की नाही याचा भरवसा राहिलेला नाही .
आम्ही झाडं तोडली,जंगल संपवली,गगनचुंबी इमारती उभारल्या हे सगळं आम्हाला मान्य आहे मात्र आम्ही तुला कायम घरातलं मानलं आहे रे,तू आमच्या कवींचा,लेखकांचा आवडीचा आहेस,अगदी कालिदास असोत की तानसेन अथवा ग्रेस किंवा भीमसेन बुवा, अगदी अलीकडच्या काळातील स्वप्नील बांदोडकर असो की संदीप खरे प्रत्येकाने तुला त्यांच्या त्यांच्या नजरेतून पाहिलं आहे,चितारल आहे,शब्दबद्ध केलं आहे,पहिला पाऊस अन मातीचा सुगंध आजही आमच्या रोमारोमात एक वेगळी नशा निर्माण करतो हे सगळं कसं विसरलास तू .कोणतीही प्रेम कविता असो की प्रियकर-प्रियसी च पहिल्यांदा भेटणं असो तू कायम आमच्या हक्काचा वाटला आहेस आम्हाला .प्रत्यक्ष देवावर सुद्धा जेवढं लिहिलं गेलं नसेल तेवढं आम्ही तुझ्यावर लिहिलं,ऐकलं, चितारल आहे रे,हे सगळं आम्ही तुझ्यावर प्रेम आहे,तू हक्काचं आहेस,तुझ्याशिवाय आमचं जगणं अवघड आहे या जाणिवेतूनच आम्ही केलं ना रे .मग आमच्यातल्याच काही स्वार्थी लोकांनी तुझ्या वाटेत सिमेंटची जंगल उभारून हिरव्या गार गालिचा ऐवजी काटे पेरले असतील तर तू मूठभर लोकांमुळे आम्हा सगळ्यांना का असा त्रास देतो आहेस .
तू अवखळ आहेस,लडिवाळ आहेस,गोजिरवाणा आहेस म्हणून तर आम्हाला आवडतोस.अनेक महिन्याचा दुष्काळ तू एका क्षणात दूर करू शकतोस हा विश्वास आहे आम्हाला .तरीसुद्धा तू यंदा जरा जास्तच कोपला आहेस की रे .जिथं नको तिथं बेफाम होऊन बरसतोस अन जिथं गरज आहे तिथं तरसवतोस ,हे वागणं काही बरं नाही गड्या .आमची लेकरं कॉन्व्हेंट मधून " रेन रेन गो अवे " म्हणत असली तरी देखील तुझी चाहूल लागताच त्यांच्या तोंडी आजही "ये रे ये रे पावसा,तुला देतो पैसा "हेच बोल येतात रे .आम्ही यंदापासून तुला शब्द देतो की तू जर वेळेवर येणार असशील तर आम्ही सुद्धा यावेळपासून तुझ्या स्वागताला हिरवागार गालिचा तयार करण्यासाठी झाडांची लागवड अन संगोपन करू .
आता एवढंच सांगून थांबतो अन हात जोडून विनवणी करतो ये रे येरे पावसा,तुला देतो पैसा, ये रे येरे पावसा .

@ लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404