Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्मार्टसिटी..! अंबाजोगाईचे बसस्थानक होतेय अद्ययावत !!▪ पंधरवाड्यात फुटणार भुमिपुजनाचे नारळ▪पावणे तीन कोटींचा निधी उपलब्ध


अंबाजोगाई // येथील बसस्थानकाचा वाढीव विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी पावणे तीन कोटी रूपयांचा निधीही मिळाला आहे. या अद्यावत बांधकाचे भुमिपुजन पुढील आठवड्यात होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. केज विधानसभा मतदार संघाच्या आ. संगीता ठोंबरे यांच्यासह बीडच्या राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांनी यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सध्या सर्वत्र कामे केली जात आहेत. यामध्ये अंबाजोगाई बसस्थानकाचाही समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाई बसस्थानक अद्यावत करण्यासंदर्भात मागणी होती. आ. संगीता ठोंबरे यांनीही शासनाकडे ही मागणी लावून धरली होती. हाच धागा पकडून बीड रापमने तो मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविला. दोन वर्षे कागदपत्रे इकडे तिकडे फिरल्यानंतर याला नुकतीच मंजूरी मिळाली. जुन्या बसस्थानकाची जागा जैसे थे ठेवून बाजुच्या परिसरात विस्तार केला जाणार आहे. यासाठी दोन कोटी ७२ लाख ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाकडूनही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून विस्तार कामाला येत्या १५ दिवसात सुरूवात होणार आहे. रापमचे विभागीय नियंत्रक अशोक पन्हाळकर, कार्यकारी अभियंता गणेश राजगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे विभागीय स्थापत्य अभियंता अविनाश मंजुळे, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय हाडबे यांच्याकडून या कामासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. इतर बसस्थानकांचेही काम लवकरच सुरू होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. अंबाजोगाई येथे सध्या एस.एच.कराड हे आगारप्रमुख म्हणून काम पहात आहेत. कराड यांच्याकडूनही यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.

▪ १३ फलाटावर राहणार बस उभ्या :
सध्या बसस्थानकाची जागा मोठी असली तरी इमारत खुप छोटी आहे. त्यामुळे याचा विस्तार करण्यात आला. एकुण १३ फलाट येथे असतील. १ ते ९ समोरच्या बाजुने तर १० ते १३ मागील बाजूस असणार आहेत. तसेच फलाटावर बसेसचे ठिकाण आणि वेळापत्रकही दिसेल.

▪ या असणार सुविधा :
बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या दोन व चार चाकी वाहनांसाठी विशेष जागा ठेवण्यात आली आहे. तसेच अंतर्गत सर्व भागात डांबरीकरण केले जाईल. पिण्याचे पाणी, कँटीन, एलईडी बल्ब, ध्वनीक्षेपक, हिरकणी कक्ष, बसण्यासाठी ग्रेनाईटचे बँच आदी सुविधा येथे असणार आहेत. तसेच चालक, वाहकांसाठी विश्रांती कक्षही उभारला जाणार आहे.

▪ दोनशे दिवसात काम पूर्ण होणार : आ. ठोंबरे
"नगर पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन रखडले होते, येत्या काही दिवसात परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात येईल. हे काम पूर्ण करण्यासाठी दोनशे दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यासोबतच नेकनूर येथील बसस्थानकाच्या भूमीपूजनाचाही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच, विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी काळवटी तलावाची उंची वाढविण्या बाबतची निविदा प्रसिद्ध व्हावी यासाठी देखील आमचे प्रयत्न आहेत."
- आ. संगीता ठोंबरे

विवेक_सिंधु_न्यूज