Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वैद्यनाथ धाम विकास संकल्पना'

 


'वैद्यनाथ धाम विकास संकल्पना'

लेखक : किरण गित्ते भा. प्र. से

भारतीय प्रशासकीय सेवेत देशभर कार्यरत असतांना आपण मूळ 'परळी वैजनाथचे' आहोत असे अभिमानाने सांगावे वाटते. बेलवाडी मंदिरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झाल्याने वैद्यनाथकृपेनेच जडणघडण झालेली. त्यामुळे वैद्यनाथ धामाच्या विकासाची नाळ आपल्या जीवनासोबत अढळ जोडलेली असे नेहमी प्रेरित होते. अमरावती जिल्हाधिकारी पदी कर्तव्यावर असताना वैद्यनाथ परिसर विकास आराखडा बनवून बीड जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला होता. आता नव्याने या विषयाकडे लक्ष केंद्रित होत असल्याने परत एकदा 'वैद्यनाथ धाम विकास संकल्पना' मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


महादेवाची बारा ज्योतिर्लिंगे म्हणजे विश्वातील ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वायू, आकाश, अग्नी, जल व पृथ्वी या बारा तत्वांचे ज्योतिस्वरूप भारतभूमीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या स्थानावर श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या वास्तव्याने पावन झालेली परळी ही तीर्थभूमी. अमृतमंथनातून वैद्यांचा राजा धन्वंतरी आणि अमृत ही रत्ने दानवांच्या हाती लागू नयेत म्हणून भगवान श्री विष्णूने अमृतासह धन्वंतरीला शंकराच्या पिंडीत लपवून ठेवले ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंग.


परळी वैद्यनाथ कॉरिडॉरची संकल्पना:


परळी शहराच्या पश्चिमेला मेरू पार्वतीच्या उतरणीला पायथ्याशी ७०-८० फूट उंचीवर श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर हे यादवकालीन आहे. इंदौर प्रांताच्या पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी शालिवाहन शके १६९९ साली श्री वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. ऐसपैस पायऱ्या, प्रशांत आवार, रमणीय परिसर, भव्य आणि भक्कम बांधकाम, चौफेर चिरेबंदी, दगडी शिखर, पाच प्रवेशद्वारे, दगडी दीपमाळ, सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप, दगडी चबुतरा, चांदीचा दरवाजा, विशाल गर्भगृह, तीर्थ घाट, पूर्व घाट, प्रशस्त उत्तर घाट ही या मंदिराची ठळक वैशिष्ट्ये आहेत. वैद्यनाथ मंदिर परिसरात इतर अकरा ज्योतिर्लिंगांची मंदिरे, तीर्थे आणि विविध देवी देवतांची मंदिरे, संतांची समाधी स्थाने आहेत. परंतु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्यालाच रहदारीचा रास्ता आणि आठवडी बाजाराचे आयोजन केले जाते. मंदिर परिसराला लागून शासकीय कार्यालये असल्याने देखील मोठ्या प्रमाणात रहदारी असते.


श्री वैद्यनाथ मंदिर परिसर दैनंदिन रहदारीतून मुक्त करणे गरजेचे आहे. यासाठी मंदिर परिसर मेरू पर्वताभोवती रिंगरोडची निर्मिती करून वैद्यनाथ मंदिर, सर्व तीर्थे, मंदिरे आणि समाधीस्थळे अंतर्गत आस्थापथाद्वारे जोडणे आवश्यक आहे. यामुळे बाबा विश्वनाथ आणि महाकालेश्वर उज्जैन प्रमाणे वैद्यनाथ धाम येथेही सुमारे २५ लक्ष वर्गफूट मंदिर परिसरात विविध विकास कामे आणि सोयी सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. भाविक, दिंडी, पालखी यांना अडथळा होणार नाही यासाठी सर्व दिशांकडून प्रशस्त भक्ती मार्ग, भाविकांसाठी विविध सुविधा यात्री निवास, स्नानगृह, प्रसादगृह, वाहनतळ, संग्रहालय, उद्यान, भोजनगृह, दवाखाना इत्यादी परिसरात करणे शक्य होईल. एमटीडीसी द्वारे दर्जेदार हॉटेलसाठी जागा ठेवणे आवशयक आहे.


वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी बेलवाडीत असलेल्या संत श्री गुरुलिंग स्वामी समाधी व मंदिराचा विकास करणे गरजेचे आहे. श्री ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंगात विठ्ठलास पाहणारे संत श्री जगमित्र नागा यांचे समाधी मंदिर आहे. आषाढी कार्तिकी यात्रेला पंढरपूरला निघालेल्या अनेक पालख्या, दिंड्या, वारकरी यांचा मुक्काम या मंदिरात असतो. वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर घाटावरील पायऱ्यालगत श्री शनी मंदिर व श्री संत वक्रेश्वराचे मंदिर आहे. मंदिर परिसरातील संत गुरुलिंग स्वामी मंदिरासमोर दक्षिणमुखी श्री गणपतीचे प्राचीन मंदिर आहे. हा गणपती बिनसोंडेचा व मल्लाप्रमाणे बैठकीच्या मुद्रेत आहे. या क्षेत्री येणाऱ्या भाविकांनी सर्वप्रथम गणपतीचे दर्शन घेऊन वैद्यनाथ मंदिरात जाता यावे यासाठी आस्थापथ निर्माण करणे गरजेचे आहे. एक जागतिक दर्जाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अशाप्रकारे वैद्यनाथ कॉरिडॉर विकसित होणे आवश्यक आहे.


मंदिर परिसरातील तीर्थांचे पुनरुज्जीवनः


सरस्वती नदीच्या काठावर उगम पावलेले मार्केडेय तीर्थात भाविक स्नान करत असत आणि तीर्थाच्या पूर्वेला •असलेल्या मार्केडेश्वराचे दर्शन घेत. जिथे 'हरी' म्हणजे विष्णू आणि 'हर' म्हणजे शिव यांची गळाभेट झाली असे हरिहर तीर्थ संपूर्ण चिरेबंदी बांधणीचे आहे. या तीर्थातील पाणी वैद्यनाथ पूजनास व अभिषेकास घेतले जायचे. बाजार प्रांगणात दक्षिणमुखी गणपती मंदिराजवळ 'अमृतकुपी हे छोटे तीर्थ आहे ज्याचे पाणी कधीच आटत नाही आणि ते पापनाशक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरात रामकुंड ही षटकोनी आकाराची जुनी चिरेबंदी बारव आहे. पूर्वी येथे येणारी भक्त विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरत असत. मंदिराच्या उत्तर घाटावरील पाययालगत श्री वक्रेश्वर मंदिराच्या समोर छोटे कुंडवजा श्री नारायणतीर्थ आहे. जिथे भगवान विष्णूने वीरभद्राने गिळलेले सुदर्शन चक्र परत मिळावे म्हणून शंकराची पूजा केली असे काकडतळे चक्रतीर्थ' नंदगौळ मार्गवर आहे. या सर्व तीर्थांचे पुनरुज्जीवन करून नियमित स्वच्छता, सौंदर्य राखणे आवश्यक आहे. उज्जैन येथील कोटी तीर्थाचे पुनरुज्जीवन अशाप्रकारे केले गेले आहे. दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिण्यात विशेष सफाई मोहीम राबवणे गरजेचे आहे.


प्रदक्षिणा मार्ग विकास:


वैद्यनाथ दर्शनानंतर शिवभक्त मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालतात. समुद्रमंथनावेळी दैत्य अमृतकलश घेऊन मेरू पर्वतावर आले. नागरूपी श्री विष्णूने देवांना अमृतकलश आणि असुरांना सुरा दिली ती याच मेरू किंवा नागनारायण पर्वतावर. पृथ्वीची भूमध्यरेषा मेरुपर्वतावरून गेल्याचेही सांगतात. मेरू पर्वत प्रदक्षिणा मार्गावर श्री बजरंगबली वेताळ मंदिर, श्री दत्तात्रयाचे मंदिर आहे. या पर्वतावरून शहराचे व वैद्यनाथ मंदिराचे निसर्ग सौन्दर्य मोठे विलोभनीय दिसते. मेरू पर्वत प्रदक्षिणा सहजपणे पूर्ण करता यावी यासाठी फूटपाथ, पायऱ्या, रेलीग्स विकसित केले जाऊ शकतात. प्रदक्षिणा मार्गाभोवती वनराई आणि उद्यान विकसित करता येईल. श्री हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे हा प्रकल्प राबवता येईल.


परळी पंचक्रोशी यात्रा:


परळी वैजनाथ देवस्थान दर्शनासाठी आलेले भाविक किमान दोन ते तीन दिवस परळी आणि परिसरात थांबले पाहिजेत यासाठी पंचक्रोशी यात्रा नियोजित करता येईल. परळीचे पूर्वद्वार धर्मापुरी येथे श्री केदारेश्वर, श्री मल्लिकार्जुन दर्शन घटनांदूर येथे श्री सोमेश्वर, त्रिपुरसुंदरी दर्शन, परळीचे दक्षिणद्वार पुण्यग्रम पूस येथे पद्मावती देवी, योगीराज शुक्राचार्य दर्शन, अंबाजोगाई येथे योगेश्वरीचे दर्शन, परळीचे पश्चिमद्वार तपोवन येथे श्री तापेश्वराचे दर्शन, नागापूर येथे नागनाथ दर्शन, जिरेवाडी येथे श्री सोमेश्वर दर्शन, टोकवाडी येथे श्री रत्नेश्वर दर्शन, मांडावा येथे श्री कालभैरव दर्शन, गोदावरी वाण नदी संगमावर श्री रामेश्वर वागीश्वरचे दर्शन, परळीचे उत्तरद्वार शाळिग्रामक्षेत्र शेळगाव येथे श्री महाविष्णू दर्शन, नाथ्रा येथे पापनाथ दर्शन, बेलंबा येथील बेलेश्वराचे दर्शन यांचा समावेश पंचक्रोशी यात्रेमध्ये करता येईल.


या सर्व मंदिर परिसरात भाविकांसाठी मूलभूत सुविधा तसेच चांगल्या रस्त्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे. परळी शहराच्या पूर्वेस शेवटच्या टोकाला ग्रामदैवत श्री कालरात्री देवीचे प्राचीन मंदिर आहे. आपला भाऊ वैद्यनाथ आणि अमृताचा घट दानवांच्या हाती लागू नये म्हणून कालरात्री देवीने प्रभू वैद्यनाथाला आपल्या पाठीमागे लपवले अशी कथा भाविक सांगतात. परळी परिसरात चार किलोमीटर अंतरावर चांदापूर-घटनांदूर मार्गावरील डोंगरावर जागृत परळीकरांची 'तुळजाई' श्री डोंगरतुकाई देवीचे मंदिर आहे. ही दोन्ही ठिकाणे पंचक्रोशी यात्रेत समाविष्ट केली जाऊ शकतात.

       वरील मंदिरस्थानांपैकी काही कृषी संपन्न भागात तर काही डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे पंचक्रोशी यात्रेसोबत कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनाचे घटक जोडले जाऊ शकतात


श्री वैद्यनाथ देवस्थान प्रचारः


ज्याप्रमाणे बद्रीनाथ, केदारनाथ, महाकालेश्वर, सोमनाथ इत्यादी देवस्थानांचा प्रचार प्रसार झाला, तसे श्री वैद्यनाथ देवस्थान परळीचे माहात्म्य देखील प्रसारित होणे गरजेचे आहे. श्री वैद्यनाथ धाम संदर्भातील साहित्याचे प्रकाशन हिंदी, इंग्रजी आणि दक्षिण भारतातील सर्व भाषांमध्ये करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगासाठी सर्किट टूरचे आयोजन, देशातील धार्मिक पर्यटनक्षेत्रातील टूर ऑपरेटरशी सतत संपर्क आणि देशातील मुख्य शहरातून परळीसाठी थेट रेल्वेची सोय करणे गरजेचे आहे.


श्री क्षेत्र वैद्यनाथ- आरोग्य पर्यटन केंद्र


श्री वैद्यनाथ क्षेत्रात धन्वंतरीची निवास असल्याने या ज्योतिर्लिंग ठिकाणाची आरोग्यकेंद्र म्हणून ब्रेडिंग केली जाऊ शकते. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाने चांगले दळणवळण असल्यामुळे शहरात विविध आरोग्य सोयी-सुविधा निर्माण करून मराठवाडा, उत्तर कर्नाटक, तेलंगणा इत्यादी भागासाठी परळी मोठे आरोग्य केंद्र बनू शकते. धार्मिक यात्रा आणि आरोग्य पर्यटन अशी सांगड घालता येईल..


परळी शहराची स्वच्छता


धार्मिक पुण्यक्षेत्र स्वच्छ आणि सुंदर असेल अशी भाविकांची अपेक्षा असते. केवळ मंदिर परिसर नव्हे तर बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, उद्याने, यात्रीनिवास या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ही जबाबदारी केवळ नगरपरिषद आणि मंदिर ट्रस्टची नसून प्रत्येक परळीकराची आहे.


मानव संसाधन विकास


परळी वैद्यनाथ येथे येणाऱ्या भाविकांना विनम्र आणि सभ्य वागणूक मिळावी यासाठी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या


सर्वजणांना आदरातिथ्याचे मूलभूत प्रशिक्षण दिले पाहिजे. रिक्षा चालक, हॉटेल कर्मचारी, मंदिरातील पुजारी आणि


कर्मचारी, व्यापार पेठेतील कर्मचारी यांना संवेदनशील राहावे लागेल. वैद्यनाथ धाम आणि विविध मंदिरे, तीर्थ, समाधी


याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी पुरेसे गाईड्स प्रशिक्षित केले पाहिजेत.


महाशिवरात्र उत्सव


शंकराच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक असणारे लिंग माघ महिन्यात कृष्ण पक्षात चतुर्दशीला प्रकट झाल्याने चार दिवस महापर्व महाशिवरात्रीचे आयोजन केले जाते. महाशिवरात्री उत्सव आणि जत्रा याबाबत प्रचार प्रसार केल्याने


वैद्यनाथ धामाचे माहात्म्य सर्वदूर पोहचण्यास मदत होईल.


वैद्यनाथ धाम विकासाचा सामाजिक-आर्थिक परिणाम


श्री क्षेत्र वैद्यनाथ धामाचा विकास परळी परिसराच्या आर्थिक सामाजिक परिवर्तनासाठी देखील आवश्यक आहे. ज्या भागामध्ये पर्यटनाचा विकास होतो तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. जगातील सर्व प्रकारच्या रोजगारांपैकी १०% रोजगार पर्यटन क्षेत्रात आहेत. त्यातही पर्यटन क्षेत्रात ६५% रोजगार महिलांना मिळतात आणि प्रामुख्याने तरुणांना रोजगार जास्त मिळतात. पर्यटन क्षेत्रात काम करण्यासाठी माफक शिक्षण आणि कौशल्य लागतं. रोजगार उपलब्ध नसल्याने ज्या व्यक्ती बेकायदेशीर कामे करतात त्यांनाही पर्यटन क्षेत्रात सन्मानाने काम मिळते. एक पर्यटक भेटी दरम्यान स्थानिक पातळीवर २२ जणांसाठी रोजगार निर्मिती करतो. हॉटेल, लॉज, होम स्टे, टॅक्सी, गाईड्स, प्रसाद, पूजा, धार्मिक साहित्य, स्मरणिकेची दुकाने, कला, संस्कृती क्षेत्रात भरपूर रोजगार निर्माण होतात. यामुळे परळी परिसरात स्वरोजगार निर्माण होतील आणि एकंदर संपन्नता वाढेल.


परळी वैजनाथ धामाचे माहात्म्य सर्वश्रुत आणि सर्वश्रेष्ठ आहेच. काशीपेक्षा एक जवभर पुण्य परळीला अधिक ठेवले आहे' हा सर्वमान्य संकेत आहे. महादेव तमोगुणी आणि आशुतोष म्हणजे सहजपणे संतुष्ट होणारा आहे. परळी तीर्थक्षेत्र स्वयंभू स्थान असल्याने त्याचा विकास प्रभू वैद्यनाथ आपल्याकडून करून घेईल हा विश्वास वाटतो..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या