मैथिली लोंढे यांचे १२ तासांचे परिश्रम; नवरात्रोत्सवानिमित्त कलासेवेतून भक्तिभावाचे दर्शन
परळी वैजनाथ शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त परळीतील श्री डोंगरतुकाई देवी मंदिरात रांगोळीतून दुर्गामातेचे मनमोहक रूप साकारण्यात आले आहे. कलावंत मैथिली लोंढे आणि त्यांच्या सहकारी आशा शिंदे यांनी तब्बल १२ तास परिश्रम घेत ही आकर्षक रांगोळी साकारली. त्यांच्या या कलाकृतीतून देवीभक्तीबरोबरच कलेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पणाचे दर्शन घडत आहे.
परळी शहरातील माणिकनगर भागातील मैथिली लोंढे या ‘कलामय आर्ट क्लासेस’च्या संस्थापिका आहेत. त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड असून, पेंटिंग, रांगोळी आणि पेन्सिल स्केचिंग अशा विविध कलाप्रकारांत त्या सातत्याने काम करतात. मात्र, रांगोळी हा त्यांचा विशेष आवडीचा कलाप्रकार आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून त्या विविध मंदिरात सेवाभावाने रांगोळी साकारत आहेत..पूर्वी महाशिवरात्रीनिमित्त २०२३ मध्ये प्रभू वैद्यनाथ मंदिरात त्यांनी शंकर-पार्वतीची भव्य रांगोळी साकारली होती. तसेच श्री संत जगमित्र नागा मंदिरात गजानन महाराजांच्या पालखी आगमनावेळी गजानन महाराज आणि विठ्ठल-रुक्मिणी यांची रांगोळी काढली होती.
काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचे रूपही त्यांनी रांगोळीतून साकारले आहे.
श्री डोंगरतुकाई देवी मंदिरातही कलासेवा करण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मैथिली लोंढे आणि आशा शिंदे यांनी एकत्रितपणे दुर्गामातेची रांगोळी साकारली. या कलाकृतीसाठी दोघींनी दोन दिवसांत नियोजनबद्ध मेहनत घेतली, तर प्रत्यक्ष रांगोळी साकारण्यासाठी सुमारे १२ तासांचा वेळ दिला.
कलेला भक्तीची जोड देत साकारलेले दुर्गामातेचे हे रूप मंदिरात येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, नवरात्रोत्सवातील धार्मिक वातावरणात कलात्मकतेची सुंदर भर घालत आहे.





0 टिप्पण्या