आपला ई पेपर online माजलगाव
विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलने दिल्ली येथे आयोजित केलेल्या सीबीएसईच्या किशोरवयीन शिखर परिषदेत नुक्कड नाटक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून मोठे यश संपादन केले आहे. शाळेने सलग तिसऱ्या वर्षी किशोरवयीन परिषदेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे शाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष होत आहे.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी दिल्लीतील बाल भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशभरातील सीबीएसई संलग्नित १०० हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत शाळेचे प्रतिनिधित्व इयत्ता नववीतील विद्यार्थी रोनक वारकरी, धनराज बजाज, भार्गवी गुंजकर, प्रांजल नरवडे, यशश्री गायकवाड यांनी केले. त्यांच्यासोबत सहशिक्षिका सुनिता सुरवसे आणि उपप्राचार्य राहुल कदम उपस्थित होते. जीवन कौशल्य, मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण या विषयांवर आधारित या परिषदेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नृत्य, चित्रकला, प्रदर्शन, भाषण, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोनक वारकरी या विद्यार्थ्याने नुक्कड नाटक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या परिषदे दरम्यान विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शैक्षणिक संचालक जोसेफ एम्माऊनेल, मनोज श्रीवास्तव, इंडिया टी.व्ही.चे अध्यक्ष रजतजी शर्मा, मंत्रालयाचे केंद्रीय आरोग्य अधिकारी आणि एक्स्प्रेशन इंडियाचे संचालक डॉ. जितेंद्र नागपाल यांच्यासारख्या नामवंत व्यक्तींचे मौलिक मार्गदर्शन लाभले.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाशदादा सोळंके, उपाध्यक्ष विरेन सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक निला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख जीबी ऑगस्टन , सुनिता सुरवसे, धनंजय सोमवंशी,अर्चना जाधव यांच्यासह सहभागी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Social Plugin