मराठी शाळा आणि मराठी साहित्य टिकले पाहिजे - संमेलनाध्यक्ष अजयकुमार गंडले यांचे आवाहन
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
परळी येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सातवे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक शिक्षकच होते, त्यामुळे समाज बदलण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांनी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक अजयकुमार गंडले यांनी आपल्या भाषणात, मराठी शाळा आणि मराठी साहित्य टिकले पाहिजे यासाठी शिक्षकांनी आता पुढाकार घेण्याचे कळकळीचे आवाहन केले.
सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून संमेलनाची सुरुवात झाली.
मुख्य संयोजक आणि ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात उद्घाटक साहित्यिक प्रभाकर साळेगावकर, संमेलनाध्यक्ष अजयकुमार गंडले, स्वागताध्यक्ष प्रदीप खाडे (नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव), मराठवाडा शिक्षक संघटनेचे नेते पी. एस. घाडगे, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, माजी संमेलनाध्यक्ष ए. तु. कराड, प्रसिद्ध कवी प्राचार्य अरुण पवार, प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, उत्तम माने, बालसाहित्यिक नागनाथ बडे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वांभर वराट आणि श्रीमती खान सबिहा अहेमद बिन अबुद चाऊस यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक प्रभाकर साळेगावकर यांनी, शिक्षक विद्यार्थ्यांसाठी साहित्यिकच असतो आणि विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाचे स्थान मोठे असते. शिक्षकांनी वर्गात नेहमी पारदर्शी भूमिका घ्यावी, असे मत मांडले.संमेलनाध्यक्ष अजयकुमार गंडले यांनी, माणसातला माणूसपण घडविणारा शिक्षकच असतो. आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लागलेले मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी शाळेत नियमन करण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष प्रदीप खाडे यांनी हे संमेलन भविष्यात राज्यस्तरीय व्हावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक रानबा गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन सिद्धेश्वर इंगोले, बा. सो. कांबळे, सुनीता कोम्मावार यांनी तर उद्घाटक परिचय व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले.
संमेलनात विविध साहित्यविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. राजकुमार कदम (बीड) यांच्या अध्यक्षतेखाली ‘नवीन शैक्षणिक धोरण व ग्रामीण शिक्षणाची गळचेपी’ या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. उमाकांत राठोड यांनी नवीन धोरणामुळे सर्वसामान्यांना स्थान नसेल, तर राजकुमार कदम यांनी शिक्षण नाकारण्याच्या धोरणामुळे ग्रामीण शिक्षणाची गळचेपी झाल्याचे मत मांडले.या सत्राचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. विक्रम धन्वे यांनी तर आभार बा. सो. कांबळे यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध कथाकार अंबादास केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात ग्रामीण कथाकार दत्ता वालेकर यांनी ‘यशाची गुरुकिल्ली’ तर अंबादास केदार यांनी ‘सालगडी’ या कथा सादर करून रसिकांची मने जिंकली.या सत्राचे सूत्रसंचालन लक्ष्मण वैराळ तर आभार गणेश खाडे यांनी मांडले.
सायंकाळच्या सत्रात प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. अरुण पवार, बालाजी कांबळे, विश्वांभर वराट, नागनाथ बडे, दत्ता वालेकर,डॉ. सिद्धार्थ तायडे,रमेश मोटे, दिवाकर जोशी ,सिद्धेश्वर इंगोले, गंगाधर क्षीरसागर ,मोहन राठोड, डॉ.प्रवीण काळे, संदेश वाघमारे, संदेश क्षिरसागर, चंद्रप्रकाश शिंदे, दिपक बिडवे, संजय शिंगणकर यांच्यासह अनेक कवींनी उत्कृष्ट कविता सादर केल्या.
या संमेलनात मराठवाड्यातील विविध शिक्षक-शिक्षिकांचा ‘शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी एकूण ७ महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले, ज्यांना उपस्थित शिक्षक-साहित्यिकांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी ठरावांचे वाचन केले. यात मराठवाडा कायम विनाअनुदानित धोरणातून मुक्त करावा.मराठी भाषा, साहित्य, संस्कृती चळवळीला बळकटी मिळावी.मराठी शाळांचे अस्तित्व जपले पाहिजे आणि खासगीकरण थांबवावे.शिक्षक आणि प्राध्यापकांची भरती लवकर करावी. शिक्षक साहित्य निर्मितीला अर्थसहाय्य द्यावे.शाळांमध्ये ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवावा. शिक्षक साहित्य निर्मितीला शासनाने पुरस्कार द्यावेत असे ठराव मांडण्यात आले.
या संमेलनास मराठवाड्यातील शिक्षक, साहित्यिक आणि परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वागत समितीचे शिवाजीराव बनसोडे, अशोक नावंदे, सौदागर कांदे, दिवाकर जोशी, विलास ताटे,गणेश खाडे,प्राचार्य अतुल दुबे ,विकास वाघमारे , विठ्ठलराव झिलमेवाड नवनाथ दाने, विद्याधर शिरसाट यांच्यासह अनेकांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. समारोप राष्ट्रगीताने झाला.

Social Plugin