Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भावसार युवा सेवाभावी संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ च्या वतीने येथील श्रद्धा मंगल कार्यालयात दिनांक 23 जून 2024 रविवार रोजी गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. इयत्ता दहावी, बारावी तसेच इतर विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न झाला. कुलदैवत हिंगलाज माता आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


याप्रसंगी भावसार युवासेवा भावी संस्थेचे अध्यक्ष श्री विलास सुत्रावे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक श्री गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या मधील विविध क्षमता ओळखल्या पाहिजेत, स्वतःमधील वेगळेपण शोधून त्या क्षमतांचा विकास करून जीवनात यश मिळवले पाहिजे असे सांगितले. रुळलेल्या आणि मळलेल्या वाटांवरून सर्वच जण चालतात परंतु स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणे फार कमी लोकांना जमते, आपणही आपल्या यशाचा मार्ग स्वतः तयार करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. 

आज आईच्या स्पर्शाची जागा मोबाईलने घेतली आहे. आपल्या सर्वच भावना आम्ही सोशल मीडियावर व्हर्चुअल पद्धतीने मांडत आहोत, इथेच विज्ञान जिंकले आणि प्रेम हरले असे म्हणावे लागते असे सांगून, मुलांना जवळ घेऊन, त्यांना प्रत्यक्ष प्रेम देऊन त्यांचे संगोपन करा असे गणेश शिंदे यांनी पालकांना सांगितले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टातील प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट सुनील काकडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माहेश्वरी महिला मंडळ परळीच्या अध्यक्षा सौ. दीपाताई बंग, भावसार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, भावसार समाज परळीचे अध्यक्ष श्री प्रभाकर हजारे, महिला अध्यक्ष सौ. सारिकाताई तांदळे आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्याचे सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे हे उपस्थित होते. 

सौ दीपाताई बंग यांनी समाजातील मुलींनी शिक्षण घेऊन प्रगती करावी मात्र अवास्तव अपेक्षा बाळगून आयुष्य कठीण करू नये, त्याऐवजी काही प्रसंगी तडजोडी स्वीकारून आयुष्य सुंदर करता येते हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. परळीतील भावसार समाजाची समाजाची पहिली महिला एम बी बी एस एम.डी. डॉक्टर पूजा बंडू हजारे व डॉक्टर अश्विनी अनिल सुत्रावे, बी ए एम एस यांची पण विशेष उपस्थिती याप्रसंगी होती. त्यांचा भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉक्टर पूजा हजारे व डॉक्टर अश्विनी सुत्रावे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. 

भावसार युवा सेवाभावी संस्था दरवर्षी सत्कार गुणवंतांचा,सन्मान सामाजिक कार्याचा, आधार गरजवंतांचा ही थीम घेऊन कार्यक्रम आयोजित करत असते. यातीलच सन्मान सामाजिक कार्याचा या उपक्रमा अंतर्गत श्रीराम जन्मभूमी मध्ये रामालल्ला च्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या आनंद उत्सव प्रसंगी परळी येथे भव्य शोभायात्रा काढल्याबद्दल लोकोत्सव समिती, परळी यांचा सन्मानपत्र, हिंगलाज मातेची प्रतिमा व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. 

या सत्कारास भास्कर मामा चाटे यांनी उत्तर दिले व भावसार युवा सेवाभावी संस्थेचे आभार मानले तसेच आधार गरजवंतांचा या उपक्रमांतर्गत सौ अपसिंगेकर यांना भावसार युवा सेवाभावी  संस्थेमार्फत शिलाई मशीन देण्यात आली. एडवोकेट सुनील काकडे यांनी अध्यक्षीय समारोप केला तर प्रसाद गरुड यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमास परळीतील सर्व स्तरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सुरवसे सर व श्री तानाजी देशमुख सर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत अतिशय भारदार पद्धतीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गोपाळ कंकाळ, शैलेश वैजवाडे,अजिंक्य गरुड, दत्ता बुलबुले, जय हंबीरे, प्रमोद पाखरे, कृष्णा बेदरकर, मनोज वायचळे, गोविंद खपले, कृष्णा बरडे, अभिषेक वळसे, रवींद्र यलशेटे,कृष्णा न बेदरकर व भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या सर्वच सदस्यांनी अतोनात परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या