Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना शासनाने आरक्षण दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही मनोज जरांगे


जर सरकार मराठा आरक्षणात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वांनी डाव हाणून पाडा

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन हक्काचे आरक्षण  मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे, सरकारची या पासून सुटका नाही, मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून ऐतिहासिक विजय जवळ आला आहे. जर सरकार मराठा आरक्षणात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वांनी डाव हाणून पाडा. आता सरकारची सुटका नाहीच असा इशारा मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे यांनी परळी येथे मराठा बांधवासी संवाद साधताना दिला आहे.

 दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी परळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. या प्रसंगी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ऐतिहासिक विजय जवळ आलाय, त्यामुळे आरक्षण मिळणारच आणि त्यातून सरकारला सुटका नाहीच. मराठा समाजाने मराठा आंदोलनाला गालबोट लागेल असे कुठलेही वर्तन करू नये. शांततेच्या मार्गानेच आरक्षणाची लढाई लढावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. जर सरकार मराठा आरक्षणात कुणाला पुढे करून फूट पाडत असेल तर त्याचे प्रयत्न सर्वांनी हाणून पाडा ताटात आलेला घास परत जाऊ देऊ नका अशी विनंती त्याला करा. कारण मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आला असून आपण सरकारला वेळ दिला नाही परंतु सरकारने आपल्याला वेळ मागितला आहे. तुम्ही चिंता करू नका आरक्षण त्याची जबाबदारी आता सरकारची आहे. मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

जल्लोषात स्वागत

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील यांचे परळी तालुक्यात येत असतांना अनेक ठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मराठा समाज बांधवाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिरसाळा व परळी शहरात जेसीबीच्या माध्यमातून पुष्प वर्षाव करत, ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

मराठ्यांचा विजय होणारच

मराठा समाजाने एकजूट  ठेवावी. आपल्यात एकजूट होणे गरजेचे आहे. ही एकजूट 14 ऑक्टोबर रोजी आयोजित अंतरवाली सराटी येथील सभेत सरकारला दाखवायची आहे. मराठा आरक्षण लढ्याचा ऐतिहासिक विजय जवळ आला आहे. विजय नक्कीच होणार आहे. हा विजय मराठ्यांचा असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना शासनाने आरक्षण दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.आता नाही तर कधीच नाही त्यामुळे हा लढा मराठ्याच्या पदरात आरक्षण पडल्याशिवाय थांबणार नाही असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या