Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिलिंडरच्या स्फोटात 11 चिमुकले गंभीर | फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्याचा जागीच मृत्यू

 


आपला ई पेपर| latur 

फुगेवाला घराजवळ आला म्हणून उत्सुकतेने धावत-पळत जमलेली ११ चिमुकले सिलिंडरच्या स्फोटात गंभीर भाजले. ही घटना रविवारी सायंकाळी लातूर शहरातील इस्लामपुरा- तावरजा कॉलनीत घडली आहे. या घटनेने फुग्यांमध्ये सिलिंडरद्वारे हवा भरणे धोकादायक असल्याचे समोर आले आहे शिवाय, असे सिलिंडर रस्त्यावर, जागोजागी घेऊन फिरणे अनेकांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते...

लातूर शहरातील तावरजा काॅलनी, इस्लामपुरा भागातील रस्ते अरुंद असल्याने घटनेची तीव्रता वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनातून लातूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, लातूर डीवायएसपी भागवत फुंदे, तहसीलदार तांदेळे यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.


५० वर्षीय फुगेवालेही जागीच दगावले...

५० वर्षीय रामा नामदेव इंगळे हे लहान मुलांना फुगे विकून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्याभोवती जमलेल्या सगळ्याच मुलांना ते मोठ्या आपुलकीने बोलत होते. फुगे विकत-विकत मुलांसोबत त्यांच्या गप्पाही सुरू होत्या. अत्यंत प्रेमाने प्रत्येकाशी बोलत, नेहमीप्रमाणे ते फुगे सिलिंडरच्या साह्याने फुगवित होते. त्यांना असे काही घडेल याची कल्पनाही नसणार.


आई- वडिलांना धक्का; सर्वांनाच फुग्यांचा धसका...

थोड्या वेळापूर्वी सगळे मुले खेळत होती. किलबिलाट सुरू होता. फुगा मला द्या... मला द्या.. म्हणत होती आणि अचानक स्फोट झाला. आई -वडिलांना धक्का बसला. ज्यांनी घटना ऐकली त्या प्रत्येकांनी गॅसवरील फुग्यांचा धसका घेतला. पंपाने फुगे भरणे बरे, अशी प्रतिक्रिया उमटली.


लातुरातील मुलीकडे फुगेवाल्याचा मुक्काम...

आंबाजाेगाई तालुक्यातील वाघाळा राडी येथील फुगे विक्रेता रामा नामदेव इंगळे हा शनिवारी रात्री दीपज्याेती नगरात राहणाऱ्या मुलीकडे मुक्कामाला हाेता. दरम्यान, रविवारी घटस्थापनेचा दिवस असल्याने फुगे विक्रीसाठी मुलीच्या घरातून जेवण करुन बाहेर पडला. फुगे विक्री करत करत ताे सायंकाळी इस्लामपुरा भागात आला अन् ही दुर्घटना घडली.


माजी मंत्री आ. देशमुख यांच्याकडून विचारपूस...

घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधून जखमींवर तातडीने योग्य उपचार करावेत. तसेच औषधी वा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता राहू नये, असे निर्देश दिले.अधिष्ठाता समीर जोशी यांच्याशी संवाद साधून सूचना केल्या. लातुरात फिरणाऱ्या विक्रेत्यांना मनपाने प्रतिबंध करावा, असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांना रुग्णालयात पाठवून आढावा घेतला.

क्रीडा मंत्री संजय बनसाेडे यांच्याकडून चाैकशी...

दुर्घटनेत मुले जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसाेडे यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधला. शासकीय रुग्णालयात जखमीवर याेग्य उपचार करावे, अशा सूचना दिल्या तसेच खासगी रुग्णालयात लागणारी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या