Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जनता द्यायची मनातून सन्मान: असे होते आदर्श नेतृत्व कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे

 आपला ई पेपर परळी 


एस टी महामंडळाच्या बसच्या सीटवर 'आमदार/ खासदार यांच्यासाठी राखीव' असे लिहिलेले वाचल्यानंतर तुम्हाला हसू येते ना? तुम्ही असा विचार करता की हे लोक कधी एसटीने प्रवास करणार? पण आपल्याच बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधर आप्पा बुरांडे हे नेहमी एसटीने प्रवास करायचे... सर्वसामान्य माणसासाठी लढा देणारे अप्पा सर्वसामान्यांसोबत राहायचे... त्यांच्या समस्या आप्पांना न सांगताच समजायच्या.... शिक्षणा वाचून तरणोपाय उपाय नाही हे अप्पांनी ओळखले होते म्हणूनच मोह्यासारख्या ग्रामीण भागातून त्यांनी शिक्षणाची दारे सर्वसामान्यांना खुली करून दिली..... 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत आप्पांनी निजामाविरुद्ध संघर्ष केला, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात आप्पांची भूमिका प्रमुख होती... रझाकराच्या काळात आप्पांच्या मागोवा पोलिसांनी केला, सर्वसामान्य जनतेने आप्पांना अटक होऊ दिली नाही... हे आपलं नेतृत्व आहे हे जनतेने मान्य केलेले होते म्हणूनच आप्पांना जनतेतून संरक्षण मिळत होते...  सध्याच्या काळात बऱ्याचदा जनतेवर नेतृत्व लादले जाते.... 

सर्वहारा मनुष्य, कामगार, मजूर, शेतकरी, शेतमजूर यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बीड जिल्ह्याचे नेतृत्व आप्पांनी केले. परळी तालुक्यातील मोहा सारख्या ग्रामीण भागातील उदयास आलेली ही तोफ बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून पुढे संसदेत धडाडत राहिली. बडेजावपणाचा लवलेशही आप्पांच्या अंगी कधी जाणवला नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न दिल्लीच्या संसदेपासून ते बीड जिल्ह्याच्या कलेक्टर पर्यंत मांडताना त्यांनी सर्वसामान्य माणसाला कधीही आपली बॅगही धरू दिली नाही... एसटीतून उतरून आपली बॅग सांभाळत कलेक्टर ऑफिस पर्यंत आपल्या बाजूने दमदार पाऊल टाकत चालत जाणारा हा मनुष्य म्हणजे खासदार आहे हे ओळखायला बऱ्याचदा लोकांना उशीर व्हायचा... आणि मग नवल वाटून त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त व्हायचा.

महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या रूपाने त्यांनी ग्रामीण भागात आणलेली शिक्षणाची गंगा आता आजूबाजूला आपली मुळे धरत आहे... 

महाराष्ट्र विद्यालय मोहाच्या प्रांगणात आप्पांचा अंत्यविधी झाला... आप्पांच्या कारकिर्दीचा मोह्याच्या ग्रामस्थांना नेहमीच अभिमान वाटतो.... येत्या एक ऑक्टोबरला आप्पांचा स्मृतिदिन आहे, या निमित्ताने गावकऱ्यांनी एकत्र येत आप्पा आणि त्यांचे सहकारी यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांची प्रेरणा पुढील पिढीने कायम घ्यावी यासाठी, स्मारकाच्या रुपात कलाकृतीमध्ये त्यांना कायम करून ठेवले आहे... आप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक प्रकारे ग्रामस्थांनी आगळीवेगळी अशी आदरांजली वाहिली आहे... 

महाराष्ट्र विद्यालय मोहाच्या प्रांगणामध्ये एक ऑक्टोबरला होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची विनंती मोहा ग्रामस्थांनी आपणास केली आहे.

एकीकडे नेत्यांबद्दल अविश्वास जनतेमध्ये वाढत असताना जनतेच्या मनातलं खरं नेतृत्व कसं होतं हे प्रत्यक्ष पाहायचं असेल तर एक ऑक्टोबरच्या या सोहळ्यात तुम्ही नक्की सहभागी व्हायला हवं... 

चंद्रशेखर फुटके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या