Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वायरल पत्र..तू तुझी गुपितं आम्हाला सॉफ्टपणे सांगशीलच ना...




सप्रेम नमस्कार..
प्रिय चंदामामा...होय बालपणापासून तू  आमचा आवडता चंदामामाच ...तुझं दिसणं मनाला प्रसन्न करणारं ...तुझे ते शीतल चांदणे आल्हादायकच ..नेहमी हवेहवेसे ...म्हणून बालपणापासूनच तुला भेटण्याची ओढ आमच्या मनात सुप्त स्वरूपात होती.आज तुझ्या भेटीसाठी आम्ही प्रत्यक्षात येऊ शकलो नसलो तरी आमच्या इस्रोच्या सहाय्याने चंद्रयान- ३ हा आमचा पाहुणा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुझ्याजवळ आलाय ...त्यामुळे आज सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटातील 'इन्सान जाग उठा' मधील मोहंमद रफीसाहेब यांनी गायलेले आणि मधुबाला-सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेले एक जुने गीत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे असे वाटते..ते गीत म्हणजे -

   "ये चंदा न रुस का..न जापान का..न अमेरिका का..ये तो हैं हिंदुस्थान का..!!"

   हे आज पुन्हा सिद्ध झाले ते इस्रोच्या चंद्रयान ३ टीममुळे !

आज कित्येक वर्षांनी केवळ तुझ्यामुळे अवघा भारत देश एक झाला.सकळ भारतीय समाज जात-पात,धर्म-पंथ,पक्ष-गट विसरुन तिरंगा ध्वजाखाली एक झाला...! आमच्या इस्रोच्या या मोहिमेने व तुझ्यामुळे ही 'सामाजिक अभियांत्रिकी' साधली गेली. त्यामुळे इस्रोमधील शास्त्रज्ञांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत..पण तुझेही विशेष अभिनंदन ...! अभिनंदनास पात्र आहेस म्हणूनच तुझे अभिनंदन करणे हे आमचे आद्यकर्तव्यच आहे.याप्रसंगाने चांदोबा तुझी प्रतिष्ठा आणि उत्सुकता अजून खूप वाढली बरं का!


प्रभु श्रीरामांना देखील लहानपणी तुला बघण्याचा मोह आवरता आला नाही..अन् कौसल्यामाईने आरशामध्ये श्रीरामाला तुझे प्रतिबिंब दाखविले..आणि स्वतः श्रीराम हे 'रामचंद्र'कधी झाले? ते आम्हाला कळालेच नाही.

राजमाता माँ जिजाऊ आईसाहेबांनी बाल शिवरायांना घास भरवताना तुझ्या साक्षीनेच हिंदवी स्वराज्य संस्काराचे बाळकडू दिले असतील.पृथ्वीवरील प्रत्येक माय माऊलीने तुझे दर्शन घडवत लेकरांना चार घास जास्तीचे भरविले असतील


तू कधी 'सुपरमुन' असतोस तर कधी 'ब्लू मून'असणारा तू अनादी काळापासून मोहक व आकर्षक 'मदनरुप'आहेस!कुणी म्हणतो तुझा जन्म 'समुद्रमंथनात'झाला.तू 'बिग बॅग'मधून जन्म घेतलास असे काहीजण म्हणतात. 'फिशन थिअरी'वेगळेच सांगते.काही शास्त्रज्ञ 'कॅप्चर थिअरी'चे पुरस्कर्ते आहेत. 'को फॉरमेशन थिअरी' काही जणांना मान्य आहे,अलीकडच्या काळात 'जायंट इंपॅक्ट थिअरी 'बाबत बऱ्यापैकी खगोलशास्त्रज्ञांचे एकमत झालेले दिसून येत आहे;पण तू अनादी अनंत आहेस हेच खरे शाश्वतसत्य ...

तुझा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसारखाच..तो संयोग की योगायोग? का काही शास्त्रीय कारण? पण या विस्मयकारक परिस्थितीमुळे तू परग्रहावरील इलियन्सद्वारा पृथ्वीवर टेहाळणी करण्याठी स्थापित केलेला 'आर्टिफिशियल उपग्रह'देखील आहेस असे काहीजणांना वाटतोस बरं का! पण आमचा 'चंदामामा'आमची जासुसी कसा बरे करेल? छ्या!..मिथ्या आहे ती!

असो,आम्हा कॉमन लोकांना तुझा जन्म कसा झाला? कधी झाला? याचे तितके स्वारस्य नक्कीच नाही. मात्र तुझे अजून मोहित करणारे रुपडं बघायची हौस मात्र नक्कीच जना जनात ,मना मनात आहे..चंद्रयान -३ अभियानातील 'विक्रम लँडर'ने तुझ्याकडे 'सॉफ्ट लँडिंग' केल्यामुळे तू त्याला आता स्वतःच्या कवेत घेतले आहेस..जणू काही तुला तुझ्या बहिणीकडून रक्षाबंधन निमित्त राखीच मिळाली आहे.आता तुला अजून जवळून बघण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आहे हे मात्र नक्की...!

सौर-चांद्र ,सोलार आणि लुनार मध्ये अडकलेले आम्ही पृथ्वीजन तुझी महती अबाधित आहे हे मान्यच करतो! हं..अजून एक..तुझ्या कोजागिरी पौर्णिमेच्या लख्ख शीतल  प्रकाशात दूध आटविले जाते..आणि तू दिसल्यावरच आमच्याकडे 'ईद'साजरी होते हे तुझे महात्म्यच! आणि ते आटवलेले दूध 'शिरखुर्रमा' पिण्याची मजा काही औरच! तू धार्मिक एकात्मतचे प्रतीक देखील आहेस!

चांदोबा!तुझ्या पृथ्वीसोबत एकरुप आणि लयबध्द फिरण्यामुळे तुला आम्ही फक्त 'सन्मुख 'बघू शकत होतो,तुझ्या चेहऱ्यावरील 'मारिया' डागामुळे तुला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावल्याचा भासच जणू आम्हाला सतत होतो.तुझ्या चेहऱ्यावर लहानपणी आम्ही ससा बघायचो आणि काल आम्हाला कळले की तुला 'शशांक' का बरे म्हणत असावेत? आणि हो..तुझा न दिसलेला चेहरा  'विन्मुख' बाजू तितकीच सुंदर आहे म्हणे!

चंदामामा तुझ्याविना आम्हा पृथ्वीवासियांचे जीवन ही कल्पनाच आम्ही करु शकत नाही.आमच्या समुद्रांची भरती-ओहोटी तुझ्यामुळेच!आमच्या चित्रपटातील हजारो गीतांच्या निर्मितीचा मानकरी तूच!! सर्वधर्मियांच्या सण-वारं -उत्सवांचा जनक तूच!

चंदा रे चंदा रे..कभी तो जमीन पर आ..बैठेंगे बाते करेंगे हे निर्भेळ मित्रत्व मागणारे आम्हीच...चांद सी मेहबुबा हो मेरी,कब ऐसा मैने सोचा था..अशी प्रेयसी मागणारे आम्हीच ...करवाचौथ व्रताला नवरा जर घरी नसेल तर तुला चाळणी दाखवून उपास आम्हीच सोडतो...नव वैवाहिक जीवनाच्या मधुचंद्राचा देखील तूच फुटाण्यावरचा साक्षीदार..नेमका तू आमचा आहेस तरी कोण?

आमच्या मराठी चित्रपटातील अभिनेत्री 'चंद्रमुखी' सुध्दा 'चंद्रा.. ' म्हणत तुझी बरोबरी करून का नाचत असावी? सुप्रसिध्द ग्रामीण मराठी कथाकार द.मा.मिरासदार यांचे 'बाबू पैलवान'नावाचे पात्र जेव्हा निरभ्र अंतराळात बघून स्वगत म्हणतं"च्या मारी...आभाळात अजून एक चंद्र असता तर लै भारी झाले असते!" यातच तू जिंकलस मित्रा!!

असो,चंदामामा तुला खूप काही बोलायचे आहे..सांगायचे आहे..आता तुझी भेट दररोज होतच राहील..तू आमच्या 'विक्रम'ला तुझ्या कवेत घेतलेस,तुझ्या साम्राज्यात 'सॉफ्ट'प्रवेश दिलास..तुझे मोठेपण सिद्ध केलेस.. आता आम्हाला तुझ्याशी हितगुज करायचे आहे. तू तुझी गुपितं आम्हाला सॉफ्टपणे सांगशीलच हा विश्वास ... तुझी ही गुपितं जाणून घेण्यासाठी पुनःपुन्हा आम्हाला अलगदपणे तुझ्याजवळ घेत जा ...तुझी गुपितं सांगत जा ... तुझ्याविषयी खूप भावना दाटून आलेल्या आहेत. त्या दुसऱ्या पत्रात लिहीन ; पण तुर्तास आमच्या शास्त्रज्ञाच्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी तू दिलेल्या साथीबद्दल धन्यवाद चंदामामा ...!    

                                     बाजीराव धर्माधिकारी यांनी चांदोबाला लिहिलेले पत्र!

प्रिय चांदोबा मामा!                                        

तुझाच लाडका भाचा  बाजीराव धर्माधिकारी

 परळी वैजनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या