आपला ई पेपर |परळी वैजनाथ
दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक कै.मोहनलालजी बियाणी यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांपुढे आदर्श निर्माण केला, त्यांची पत्रकारिता नव्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी केले.
कै.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंतीनिमित्त परळीतील दैनिक मराठवाडा साथीच्या कार्यालयात शनिवारी (दि.19) सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री वाकडे बोलत होते. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार बी.एल.रुपनर, संपादक सतीश बियाणी यांच्यासह पत्रकार धनंजय आरबुने, जगदीश शिंदे, प्रकाश चव्हाण, सुरज बियाणी, नवल वर्मा, बालाजी ढगे, आनंद हाडबे, नरसिंग अन्नलदास संतोष बारटक्के आदींसह इतर पत्रकार उपस्थित होते.
श्री वाकडे पुढे बोलताना म्हणाले, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काकाजींनी परळीत दैनिक मराठवाडा साथीच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरूवात केली, शहराच्या विकासाचे, लोकांच्या समस्यांचे प्रश्न आपल्या वर्तमानत्रातून मांडले, पत्रकारिता करण्याबरोबरच शहरातील सामाजिक चळवळीत, रेल्वे प्रश्नांवर त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला, त्यांची पत्रकारिता व समाजकार्य सदैव प्रेरणादायी आहे असेही श्री वाकडे म्हणाले. प्रास्ताविक दैनिक मराठवाडा साथीचे निवासी संपादक प्रकाश चव्हाण यांनी केले. पत्रकार धनंजय आरबुने यांनी यावेळी बोलताना कै.मोहनलालजी बियाणी यांच्या पत्रकारितेच्या कार्याबद्दल आपले विचार मांडले. आभार प्रदर्शन प्रकाश वर्मा यांनी केले.
Social Plugin