अंबाजोगाईत शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून प्रशांत सामाजिक चळवळीत उतरला. विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमाचे संचलन करणे, बातम्या बनवणे, ही कामे त्याने यशस्वीपणे पार पाडली. वाणिज्य शाखेतून बारावी झाल्यावर कुटुंबातील कर्ता मुलगा म्हणून त्यांच्या वडिलांनी प्रशांतला औरंगाबादला एका टायर कंपनीत कामाला लावले. तीन एक वर्षे तेथे काम केल्यावर तो पुन्हा गावी परतला. पुढील काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरु केले.
स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना त्यांना बातमी लिहिण्याची नियमित सवय लागली. साहेबांच्या कार्यक्रमाच्या बातम्या वर्तमानपत्र व पत्रकारांना ते देत गेले. यातुनच त्यांचा बातमीदारीकडे कल वाढत गेला. दैनिक मराठवाडा साथीत काम करत असताना पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कामातून आपली ओळख करुन दिली. सर्वसामान्यांपासून ते व्यापारी, उद्योजक, राजकारणी, डॉक्टर, वकील आशा विविध स्तरातील अनेकांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. अनेकांना ते आपल्या कुटुंबातील सदस्यच वाटायचे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना त्यांनी न्याय दिला. अनेकांना ‘हिरो’ केले. साथीच्या दिवाळी अंकाच्या कव्हर स्टोरीसाठी विषय-व्यक्ती निवडणे व त्यांची मुलाखत घेणे, त्यांच्यावर लेख लिहिणे याची तयारी ते कितीतरी दिवस अगोदर करायचे. यामुळे त्यांच्या कव्हर स्टोरीचे कौतुक व्हायचे. साथीच्या माध्यमातून शहरात व वाचकांसाठी आयोजित उपक्रमातही त्यांचा सहभाग असे. अनेक उपक्रम व कार्यक्रमाचे ते संकल्पक, संयोजक व सुत्रसंचालकही असत. रोजच्या कामाचा कंटाळा आला की चार-दोन दिवस मित्र परिवारासोबत कुठेतरी बाहेर फिरुन यायचे. कोकण व गोवा त्यांचे आवडीचे ठिकाण. परळीतील अनेक मित्रांना त्यांनी कोकण, गोव्याची सफर घडऊन आणली. कामाचा ताण वाढला की मोबाईलवर, कॉम्प्युटरवर काही वेळ गेम खेळायचे आणि पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागायचे. सदैव आनंदी राहणे, चमचमीत आवडीच्या पदार्थांवर ताव मारणे ही त्यांची आवड. आयुष्यातील दुःख, चिंता, तणाव, काळजी त्यांनी कधी चेहर्यावर दाखवली नाही की मित्रांना कळू दिली नाही. या सर्व गोष्टी त्यांनी ‘हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया‘ या गाण्याप्रमाणेच पुढे नेल्या. पत्रकारिता करताना अनेक ठेचा लागल्या. संकटे आली परंतु त्याचा त्यांनी खंबीरपणे सामना केला. त्यांच्या आदर्श पत्रकारितेची दखल घेऊन परळी पत्रकार संघाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविले. शिवाय साथीचा ‘परळीभूषण’ पुरस्कारही त्यांना दिला गेला.
रोटरी क्लब जॉईन केल्यानंतर त्यांनी विविध कार्यक्रमाचे परळीत सुत्रसंचालनही करणे त्यांनी सुरू केले. पुढे परळीत राजकीय, सामाजिक आशा विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट सुत्रसंचालनही ते करु लागले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्यासाठी त्यांना आग्रह होऊ लागला. ते आनंदाने व आवडीने ही जबाबदारी स्वीकारु लागले. कोणतेही काम सोपवा नाही म्हणायचे नाही. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. परळीत होणार्या अनेक सामाजिक कार्यक्रमात कुणाला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानपत्र संयोजकाला द्यावयाचे असल्याचा त्याचा मजकूर प्रशांतकडूनच लिहिला जायचा.
परळीतील सीटीन्यूजला बराच काळ प्रशांतने बातम्या दिल्या, त्याचे संकलन केले, महाराष्ट्र दर्शन या नावाने तीर्थयात्रेची गाडी काढली, या माध्यमातून अनेकांना नाममात्र दरात तीर्थयात्रा त्यांनी घडऊन आणली. परळीत व्यवसायिक नाटक आणली, प्रेस चालवली असे अनेक व्यवसाय त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासात केले. दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक कै.मोहनलालजी बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांतची खर्या अर्थाने पत्रकारिता बहरली. मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, सतीश बियाणी, जगदीश बियाणी यांच्या साथीने पत्रकारितेच्या विविध क्षेत्राला प्रशांतने गवसणी घातली.अलिकडे त्यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या नाईट सा्ग या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला.उत्कृष्ट पत्रकार, चांगला संपादक, छान सुत्रसंचालक, सामाजिक कार्यकर्ता, सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श, अनेकांचा ‘गाईड’, खुप जणांचा मित्र, उत्तम निवेदक, बोलण्यात, लिहिण्यात गोडवा व आपलेपणा असणारा भला माणूस! आयुष्याच्या प्रवासात माणसं जोडणारा व वाचणारा आदर्श व्यक्ती म्हणून ओळख असणार्या प्रशांतच्या अशा अकाली जाण्याने शेकडो जणांना मोठी हुरहुर लागली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रभु वैद्यनाथ चरणी प्रार्थना!
लक्ष्मण वाकडे, पत्रकार
परळी वैजनाथ, मो.9881244075
Social Plugin