स्नेहसंमेलनाच्या रंगतदार कार्यक्रमांनी माजलगावकर भारावले
आपला ई पेपर online / माजलगाव
“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला, क्रीडा व संस्कारांचे व्यासपीठ देणारी सिंदफणा पब्लिक स्कूल म्हणजे गुणवत्तेचा आणि कलेचा संगम आहे,” असे प्रतिपादन बीड येथील के. एस. के. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नाट्य विभागप्रमुख प्रा. संजय पाटील देवळाणकर यांनी केले. ते विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलचे वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन ‘सप्तरंग – जीवनाच्या विविध छटा’ चा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सविस्तर वृत्त असे की,स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रा. संजय पाटील देवळाणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून गुरुकुल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व सीबीएसई बीड जिल्हा समन्वयक शितल सर्वज्ञ यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शाळेच्या सचिव मंगलताई सोळंके, नीला देशमुख यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्नेहसंमेलनाच्या दोन्ही दिवशी शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांनी शाळेचा सविस्तर वार्षिक अहवाल सादर करून शैक्षणिक, सहशैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केले. पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाचे उपप्राचार्य सौदागर साखरे यांनी तर दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाच्या उपप्राचार्य सुवर्णा शिंगणे यांनी आभार प्रदर्शन केले.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, नाट्य, गीत व समूह सादरीकरण कार्यक्रम उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. नृत्य शिक्षिका रेखा होके यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या हनुमान चालीसावरील नृत्याला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
याचवेळी विज्ञान विभाग प्रमुख राजेंद्र सवई यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन तसेच कला विभागाच्या हस्तकला व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणारा शिक्षिका कांचन काळे यांचा विशेष प्रकल्पही लक्षवेधी ठरला.संपूर्ण स्नेहसंमेलन आनंददायी, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रदीप बुरकुल व देवेंद्र सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले.



Social Plugin