बीड आणि पुणे पोलिसांची संयुक्त कामगिरी
बीड : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात झालेल्या जबरी चोरीच्या घटनेतील तिघा आरोपींना बीडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले. आंतरजिल्हा समन्वयातून झालेली ही कारवाई विशेष ठरली असून बीड आणि पुणे पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या.
घटनेची माहिती अशी की, 12 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारास कुरुळी परिसरात कमलाकर मोहिते यांची पिकअप गाडी अडवून तिघा अनोळखी इसमांनी त्यांना मारुती स्विफ्टमध्ये जबरदस्ती बसवले. शिवीगाळ व मारहाण करत मुळशेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या मागे नेऊन लुटमार करण्यात आली. पीडिताकडे रोख 15 हजार रुपये, महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड तसेच ओळखीच्या व्यक्तीकडून फोनपे द्वारे 24 हजार 300 रुपये जबरदस्तीने वसूल करून एकूण 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी नितिन शिंदे (26, रा. चाकण, पुणे), वैभव माने (23, रा. चाकण, पुणे) आणि विशाल जाधव (32, रा. रमाई चौक, बीड) हे गुन्ह्यानंतर फरार झाले होते. परंतु म्हाळुंगे पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर बीड शहर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. डीबी पथकातील पीएसआय महेश जाधव, पोह राठोड, बावनकर आणि पोअ राम पवार यांनी शहरात शोध घेतला असता आरोपींची गाडी आढळून आली.त्यानंतर सापळा रचण्यात आला.
सुरुवातीला आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत, मात्र रात्री उशिरा साडेदहाच्या सुमारास तिघेही आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. चौकशीत त्यांनी बीडमध्येही गुन्हा करण्याचा बेत आखल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ व त्यांच्या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.


Social Plugin