Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निधन I आर टी देशमुख यांच्या निधनाची बातमी कळताच ना. पंकजाताई मुंडे तातडीने लातूर कडे रवाना

बीड।दिनांक २६। 

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार आर टी देशमुख यांचे आज दुपारी रस्ता अपघातात दुःखद निधन झाले. घटनेची माहिती मिळताच नांदेड दौर्‍यावर असलेल्या राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे हया आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने लातूरकडे रवाना झाल्या.

देशमुख यांच्या भीषण अपघातात  अपघाताचे कारण अस्पष्ट, तपास सुरू

आपला ई पेपर लातूर प्रतिनिधी

 माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनमानसात 'जीजा' या नावाने लोकप्रिय असलेले आदरणीय आर. टी. जीजा देशमुख (वय अंदाजे ७०) यांचे बेलकुंड, ता. औसा, जि. लातूर जवळ भीषण अपघातात निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेने बीड आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण माजलगाव मतदारसंघात शोककळा पसरली असून, राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हे आपल्या गाडीने (गाडी क्रमांक एमएच ४४ एडी २७९७) प्रवास करत असताना बेलकुंड गावाजवळ औसा रोडवर त्यांच्या गाडीला आज दिनांक 26 मे रोजी दुपारी भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, गाडीचे मोठे नुकसान झाले असून, देशमुख यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. समोरून येणाऱ्या वाहनाशी धडक झाली की, गाडीवरील नियंत्रण सुटले, याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.* पंचनामा करून देशमुख यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

आर. टी. जीजा देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. सर्वसामान्यांशी त्यांचे थेट आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. जनतेच्या सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होत असत, त्यामुळे 'जीजा' या नावाने ते जनमानसात प्रिय होते. त्यांच्या निधनाने माजलगावची मोठी हानी झाली असून, एक तळमळीचा आणि जनतेच्या हितासाठी झटणारा नेता हरपल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनाची बातमी पसरताच अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि हजारो समर्थकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. देशमुख यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






सर्व कार्यक्रम केले रद्द ; देशमुख यांच्या मुलांशी संपर्क साधून केले सांत्वन 

    लातूर जिल्हयातील बेलकुंड जवळ एका रस्ता अपघातात माजी आमदार आर टी देशमुख यांचं दुःखद निधन झालं. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या निधनाची बातमी कळताच नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी नांदेड येथे असलेल्या ना. पंकजाताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले व त्या तातडीने लातूर कडे रवाना झाल्या. आर टी देशमुख यांना लातूर येथील सहयाद्री हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हाॅस्पीटलचे डाॅ किणीकर यांच्याशी त्या बोलल्या. आर टी देशमुख यांचे चिरंजीव रोहित सध्या जपान मध्ये आहेत, त्यांच्याशी व राहूल यांच्याशी देखील ना. पंकजाताई मुंडे यांनी संपर्क साधून सांत्वन केले व धीर दिला.

दुःखद आणि वेदनादायी

आर टी जिजा यांच्या बातमीने मला धक्काच बसला. ही घटना माझ्यासाठी खूपच दुःखद आणि वेदनादायी आहे. जिजा आमचे ज्येष्ठ सहकारी होते. लोकनेते मुंडे साहेबांचे ते निष्ठावान सहकारी होते, त्यांच्या जाण्याने मला खूप वेदना होत आहेत अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या


भावपूर्ण श्रद्धांजली!!

एक प्रेमळ,सुसंस्कृत आणि उमद्या मनाचा नेता आपल्यातून निघून गेला...मनमिळाऊ स्वभावातून आणि संघटन कौशल्यातून जिजानी आपले नेतृत्व सिद्ध केले होते...अतिशय संयमी आणि प्रामाणिक निष्ठावान नेत्याला आम्ही मुकलो आहोत... भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे काम करण्याची आणि शिकण्याची संधी मला प्राप्त झाली..त्यांच्या जाण्याने आम्ही एक चांगल्या नेत्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहोत.


बाजीराव धर्माधिकारी 

माजी नगराध्यक्ष व शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ