Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महिला मेळावा' आणि ' लोकशास्त्र सावित्री' नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन

 माजलगाव विकास प्रतिष्ठान तर्फे महिला सशक्तीकरणाचा अभिनव उत्सव



आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी

येथील माजलगाव विकास प्रतिष्ठान व लोकनेते सुंदरराव सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिवसभराची कार्यक्रम मालिका आयोजित करण्यात आली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात येणार आहे.

सकाळच्या सत्रात 'महिला मेळावा २०२५' चे आयोजन सकाळी १०.३० वाजता सुंदरराव सोळंके महाविद्यालयात होणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मंगला सोळंके, अध्यक्ष माजलगाव विकास प्रतिष्ठान व लो. सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल विवाह प्रतिबंधाच्या क्षेत्रात कार्यरत श्रीमती सोनिया हंगे (वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, महिला व विकास विभाग) या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम माजलगाव विकास प्रतिष्ठान च्या सचिव नीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून, माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तथा  विधीज्ञ. पल्लवी सोळंके  विशेष उपस्थितीमध्ये मंचावर उपस्थित राहणार आहेत . मेळाव्यात बालविवाह प्रथा निर्मूलन तसेच महिलांच्या आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, कायदेशीर अधिकार आणि सामाजिक स्थान या विषयांवर सखोल चर्चा होणार असून, उपस्थित महिलांना त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे जिजामाता नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी लढा बालविवाह प्रथा निर्मूलनाचा ही नाटिका सादर करणार आहेत.

महिला दिनाच्या कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी 'लोकशास्त्र सावित्री ' या विचारप्रवर्तक मराठी नाटकाच्या प्रयोगाने होणार आहे. या नाटकाची निर्मिती थिएटर ऑफ रेलेव्हन्स शुभचिंतक आणि प्रयोग प्रयोगकर्ता मुंबई यांची असून लेखन व दिग्दर्शन रंगचिंतक मंजुळ भारद्वाज यांनी केले आहे. समाजातील महिलांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे भाष्य करणारे हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आहे. या नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावस्कर,कोमल खामकर, तुषार म्हस्के ,संध्या, नृपाली, प्रियंका, तनिष्का, अरोही, प्रांजल  आणि अन्य कलाकार भूमिका साकारणार आहेत. या नाटकाचं प्रकाशयोजना श्री अशोक घोलप यांनी केलेला आहे .या चिंतनशील नाटकाद्वारे महिलांचे सामाजिक स्थान, त्यांच्या समस्या आणि स्वातंत्र्य यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नाटकाचे प्रवेश शुल्क प्रत्येकी १०० रुपये असून, शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत दर ५० रुपये प्रत्येकी ठेवण्यात आला आहे. नाटकाच्या प्रवेशिकांसाठी संपर्क क्रमांक ९८६००८०७७३,९१५८३६३२२३, ९८२३४८८८२०, ९४०३५८९१८२,८४०८८८०८६९ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याच दिवशी लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचे ही हे औचित्य असल्याने, या कार्यक्रमांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमांद्वारे माजलगाव येथे महिला सशक्तीकरणाचे वातावरण निर्माण होणार असून, यामुळे स्थानिक व ग्रामीण महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.