Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिकाने, योग्य नियोजनासाठी नेमली पथके -मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे

आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी 


पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी - 

नळांना मोटारी बसवू नयेत, तोट्या बसवून घेण्याचे केले आवाहन, पाणी जपुन वापरा

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिका सरसावली असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व योग्य नियोजनासाठी वेगवेगळ्या विभागात पथके नेमली आहेत. येत्या काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिका योग्य ती पावले उचलत आहे. रात्र  नागरिकांनी खबरदारी घेऊन पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे. पाणी सुटल्यानंतर नळांना मोटारी बसवू नयेत आणि ज्यांच्या नळाला तोट्या नाहीत त्यांनी तातडीने तोट्या बसवून घ्याव्यात असेही त्यांनी आवाहन केले. 

              आगामी काळात भीषण पाणी टंचाईचे संकट जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची जबाबदारी नगर परिषद घेत असली तरी नागरिकांनीही संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन पाणी जपुन वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी पातळीमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. शहरातील अनेक बोअरवेल, इंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नागपूरच्या धरणामध्ये पाणीसाठा मुबलक असला तरी आणखी तीन महिने याच पाण्यावर तहान भागवावी लागणार आहे. शहराच्या विविध भागांमध्ये आत्तापासूनच पाणी टंचाईसाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. याची गंभीर दखल घेत नगरपालिकेने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.

*पाणी जपून वापरा, अनावश्यक उपसा करू नका*

      सध्या नगरपालिकेकडून पाच दिवस आड करून पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाणी साठवण्यासाठी नागरिक मोटारी लावून पाण्याचा उपसा करतात आणि पाणी भरणे झाले तरी मोटार चालू न करता अनावश्यक पाणी उपसा सुरू ठेवतात. यामुळे पुढील नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी आपले पाणी भरणे झाले की नळाची तोटी बंद करून पुढील पाणी भरणाऱ्या सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.

      सध्या अनेक विभागामधील नळांना तोट्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. नळांना तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर किंवा नालीत सोडल्या जात असल्याचे दिसून येते. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून तोट्या नसलेल्या नळांना तातडीने तोट्या बसवून घ्याव्यात आणि पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही मात्र याचवेळी नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करून मोटारी लावून आपली वाहने धुऊ नयेत आणि अनावश्यक पाण्याचा उपसा करू नये असे आवाहनही मुख्याधिकारी कांबळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या