अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या आरोग्य तपासणी शिबिरास पहिल्या दिवशीच मोठा प्रतिसाद
आपला ई पेपर / परळी
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो.समाज आरोग्यमय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो तर दुसरीकडे समाजातील वाईट प्रवृत्तीवर हल्ला करून समाजाचे सामाजिक आरोग्य सांभाळण्याचे काम पत्रकार करतो. या पार्श्वभूमीवर पत्रकारांचेही आरोग्य अबाधित असणे आवश्यक असून आज झालेला आरोग्य शिबिराचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. असे मत परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय ढवळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी परळी येथील उपजिल्हा रुग्णालय व अ.भा. मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज पहिल्याच दिवशी 60 पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या अंतर्गत विविध प्रकारच्या तपासण्या, ईसीजी, सोनोग्राफी, नेत्र तपासणी, आदिसह रक्त तपासण्या करण्यात आल्या. प्रारंभी पत्रकार संघाच्या वतीने सहभागी डॉक्टरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. यावेळी प्रत्येक पत्रकार आपली आरोग्य तपासणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करताना दिसून येत होते. उपजिल्हा रुग्णालयातील दहा डॉक्टर्स व परिचारिका आदींनी या कामात अमूल्य असे सहकार्य केले.
यावेळी बोलताना परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय ढवळे यांनी सांगितले की, पत्रकारांना बातमीसाठी 24 तास कार्यरत राहावे लागते. अशा वेळी आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकारांचे आरोग्य अबाधित राहणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या शिबिरातून छोटे मोठे आजार दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ज्यांना ज्या वैद्यकीय सेवा अपेक्षित आहेत त्या सुद्धा आम्ही देत असल्याचे ते म्हणाले.
या शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय ढवळे, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. दिनेश कुरमे, डॉ. अमोल देवळे, डॉ. राजमाने , डॉ. किशोर घुबडे, डॉ. बालाजी फड, डॉ. पूजा राजमाने, डॉ. सविता मुंडे, डॉक्टर डोळे मॅडम, रणजीत मस्के, तसेच अर्चना गुंडरे सिस्टर, विजयमाला टाक, डॉ. वसीम शेख, बिएमआय मिलिंद सोनकांबळे, एच आय व्ही विभागातील डॉ.वसीम शेख, डॉ. शरद चव्हाण, इन्चार्ज टाकळकर सिस्टर, मेट्रन गायकवाड मॅडम, जगतकर सिस्टर यांनी आपली सेवा शिबिरासाठी दिली होती. शिबिरा अंतर्गत आज दि.13 डिसेंबर 2022 रोजी पत्रकार व कुटुंबातील उर्वरित सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा पत्रकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. विजय ढवळे तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय अरबुने, शिबिराचे प्रोजेक्ट चेअरमन जगदीश शिंदे तसेच तालुकाध्यक्ष बालकिसन सोनी उपस्थित होते.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अ.भा मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य धीरज जंगले, संपादक आनंत कुलकर्णी, संपादक बालासाहेब फड, माणिक कोकाटे आदी परिश्रम घेत आहेत.


Social Plugin