प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमात विविध पुरस्काराचं केलं वितरण
परळी /शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यात वंदनाताईंच योगदान मोलाचं होतं, त्यांची आठवण सातत्याने येत राहिल, त्यांच्या नावानं दरवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्यांना 'वंदना' पुरस्कार देण्याचा मनोदय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श शिक्षिका दिवंगत वंदनाताई पारसेवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आर्य वैश्य मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, भागवताचार्य रूपालीताई सवणे, बनवसकर महाराज, भानुदास वट्टमवार, विकासराव डुबे, नागनाथ पारसेवार आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गौरी-गणपती स्पर्धा आम्ही आयोजित करतो, त्यात वंदनाताईंचा नेहमी हिररिने सहभाग असायचा. त्यांची उणीव आम्हाला भासत राहील. त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याचे पंकजाताई यावेळी म्हणाल्या. वंदनाताईंच्या कन्या कु. आरती व कु. पूजा यांचा विशेष उल्लेखही त्यांनी भाषणात केला. यावेळी पंकजाताईंच्या हस्ते गादेवार यांना समाजभूषण तर उन्मेष मातेकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वितरित करण्यात आला. वंदनाताईंच्या स्मृती विशेषांकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास शहरातील व्यापारी, वीरशैव बांधव, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.


Social Plugin