Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|'स्वामी रामानंद तीर्थ '|या संन्यस्थ परीस स्पर्शाने ‘याेगेश्वरी’ तेजाेमय व ज्ञानमय झाली |

 |'स्वामी रामानंद तीर्थ '|या संन्यस्थ परीस स्पर्शाने ‘याेगेश्वरी’ तेजाेमय झाली|ज्ञानमय झाली

 


अंबाजोगाई येथे आज मराठवाडा मुक्ती दिन च्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ यांचे पुतणे डॉ दिलीप खेडगीकर यांचा सत्कार उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केला .






या हरिभाऊ...बसा...पाया बिया काही पडू नका... एखाद्या गाभाऱ्यातून घंटानाद व्हावा असा अावाज त्या ऋषीतुल्य अशा व्यक्तीने उच्चारल्यानं




तर जाेगाई हाॅलमध्ये बसलेल्या उपस्थितांत राेमांच उभे राहिले. हा तुमचा धाकटा मुलगा वाटतं... बाबांनी स्मित केले...णि मला नमस्कार करायला लावला...त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. तो स्पर्श वेगळाच होता..शब्दापलीकडला..!


स्वामी रामानंद तीर्थ.. ज्यांच्या परिसस्पर्शाने याेगेश्वरी शिक्षण संस्था तेजाेमय झाली...ज्ञानमय झाली... त्या स्वामीजींना त्रिवार वंदन करत अनेकदा त्यांच्या अाठवणी मनाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. तसे पाहिलेे गेले तर मी  लहानपणापासून अनेक संन्यासी याेगी पाहिले अाहेत.  त्यात प्रामुख्याने योगारूढ कै. किशनराव कुर्डूकर, पाचलेगावकर महाराज,  बाबा ज्यांच्यासाेबत भूदान यज्ञासाठी गेले हाेते ते विनाेबा भावे ...या प्रत्येक व्यक्ती या ..जीवनाकडे संन्यस्थ नजरेने पाहत असत. त्यांनी जगाचा संसारच केला अाणि स्वत: निर्माेही राहिले. संत ज्ञानेश्वर अापण पाहिलेले नाहीत, परंतु विश्वात्मक कल्याणाची कामना करणारे, त्यांचे' पसायदान" आज भारतात नव्हे तर जगाच्या कान्याकाेपऱ्यातील लाेकांच्या ह्रदयात पाेहाेचलेले आहे. ताेच भक्तीभाव येथे जाणवतो.. आज स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विषयी..भले ते  पार्थिव देहाने जरी नसले तरी त्यांनी केलेले कार्य याेगेश्वरी शिक्षण संस्थेच्या रुपात आजही आदरणीय आहे...स्मरणीयआहे...


स्वामी रामानंद तीर्थ हे पूर्वाश्रमीचे व्यंकटेश भवानराव खेडगीकर...विजापूरजवळ इंडी जिल्ह्यात सिंदगी येथे 3 अाॅक्टाेबर 1903 राेजी त्यांचा जन्म झाला. अाईचे नाव यशाेदाबाई...वडील कानडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक...खेडगी या  सिंदगी शेजारच्या गावात वडिलाेपार्जित शेतजमीन...त्यामुळे आडनाव खेडगीकर...स्वामीजींच्या सिंदगीच्या जन्मस्थानी ‘वीर साैध’ (कानडीत साैद्ध म्हणजे स्मारक) बांधून कर्नाटक सरकारने त्यांच्या स्मृती जतन केल्या अाहेत...कर्नाटकातील गुलबर्गा, रायचूर अाणि बिदर, संपूर्ण मराठवाडा तसेच तेलंगणाचे काही जिल्हे असणाऱ्या हैदराबाद संस्थानचे स्वामीजी हे ‘मुक्तीदाते’ ठरले.

‘माेडेल पण वाकणार’ नाही हे तत्त्व त्यांनी अायुष्यभर अंगिकारले. त्यांचे वडिल भवानराव विरक्त वृत्तीचे हाेते. संसार अर्धवट साेडून संन्यासी झाले. परंतु गुरूला समजल्यानंतर त्यांनी त्यांना परत पाठवले. संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच ही कथा अाहे. चार बहिणी अाणि तीन  भाऊ...अण्णाराव हे सर्वात माेठे रेल्वेत तार मास्तर हाेते. भीमराव ऊर्फ बेथूजी हे छाेटे बंधू... नंतर ते याेगेश्वरी शाळेत शिक्षक झाले. त्यांचे अाणि स्वामीजींचे शिक्षण अाई वडिलांच्या निधनामुळे काकांनी पूर्ण केले.... त्यांचे नाव रामभाऊ खेडगीकर. ते प्रसिद्ध कामगार नेते अाणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य हाेते. स्वामीजींच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती साेलापूर रेल्वे स्टेशनवर झालेल्या गांधीजींच्या भेटीमुळे...‘देश के लिए कुछ कराे’....हा महात्मा गांधीजींचा संदेश त्यांनी शिराेधार्य मानला. वीर उस्मान अली हा असफजाही घराण्यातील शेवटचा निझाम...त्यापूर्वीचा सहावा निझाम वीर महेबूब अली .

13 सप्टेंबर 1948  राेजी सुरू झालेल्या पाेलिस अॅक्शन नंतर हैदराबाद नभाेवाणीवरून 17 सप्टेंबर 1948 राेजी सातव्या निझामाने भारतीय संघ राज्यात विलीन हाेण्याची कबुली दिली अाणि स्वामीजींना तुरूंगातून मुक्त केल्याचेही घाेषित केले...निजामाचा  ध्वज उतरवून त्या जागी भारताचा तिरंगा फडकविण्याचे श्रेय स्वामीजी नेहमी त्यांच्या नेतृत्त्वाखालील लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना देत असत. 1935 मध्ये हिप्परगा (ता.तुळजापूर) येथील राष्ट्रीय शाळेतील नाेकरी साेडून ते अंबाजाेगाईच्या प्राथमिक शाळेत पुनरूज्जीवन करून नव्याने निर्माण झालेल्या याेगेश्वरी नूतन माध्यमिक विभागाचे विद्यालयाचे संस्थापक अाणि मुख्याध्यापक झाले. त्यांना धारूर येथील अार्य समाज कार्यकर्त्यांनी येथे शाळा स्थापन करण्याचा अाग्रह केला हाेता, परंतु अॅड. नारायणराव (नाना) जाेशी यांच्या सल्ल्यानुसार ते अंबाजाेगाईला अाले...नंतर बाबासाहेब परांजपे, अाचार्य ग.धाे.देशपांडे अादी शिक्षकही त्यांच्या पाठाेपाठ अंबाजाेगाईला अाले. वडिलांच्या वैराग्य वृत्तीचा प्रभाव होता.1920 मध्ये लाेकमान्य टिळकांच्या निर्वाणानंतर साेलापूर येथे घेतली संन्यासी हाेण्याची प्रतिज्ञा...अंमळनेरच्या काॅलेजमधील प्राचार्य गुणे  (स्वामी कैवल्यानंद) यांचे संस्कार अाणि हिप्परग्याच्या काकासाहेब देशमुखांचा (अनंदमूर्ती) यांचा सहभाग यामुळे 1930 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी संन्यास घेतला



लखनऊच्या स्वामी रामतीर्थांचे उत्तराधिकारी नारायण स्वामी यांनी हिप्परग्याच्या अाेढ्याजवळ झाडाखाली व्यंकटेश खेडगीकरांना संन्यास दिक्षा दिली हाेती, ताे विधीवत संन्यास हाेता. मुख्याध्यापकपदावर असताना स्वामीजींना संस्थानातील जनतेची घुसमट जाणवली. 1937 मध्ये जून महिन्यात परतूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या पहिल्या अधिवेशनानंतर हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुस्कटदाबीची स्वामीजींना कल्पना अाली. 9 जून 1938 राेजी तत्कालीन माेमीनाबादचा (अंबाजाेगाई) निराेप घेऊन ते जुलमी निझामाविरुद्ध थेट लढण्यासाठी हैदराबादेत गेले. महात्मा गांधीजींच्या वेळाेवेळी भेटी घेऊन शक्य तेथे अहिंसक मार्गाने अाणि जातीय वळण न येऊ देता त्यांनी अांदाेलनाचे नेतृत्त्व केले. देशभक्तीच्या त्यांंच्या संस्कारामुळे याेगेश्वरी शाळेतील अनेक विद्यार्थी या मुक्ती लढ्यात सहभागी झाले. निझामाबाद, चंचलगुडा आणि गुलबर्गा कारागृहात त्यांनी तुरुंगवास भाेगला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1952 मध्ये गुलबर्गा अाणि 1957 मध्ये अाैरंगाबाद लाेकसभा मतदार संघातून निवडून येऊन ते खासदार झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तसे तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ व घाटी रुग्णालयाची स्थापना 1958 मध्ये ते खासदार असताना झाली. अंबाजाेगाईस वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची त्यांची मागणी त्यांनी क्षयराेग रुग्णालयाच्या धर्मशाळेच्या उद‌्घाटनाच्यावेळी केली हाेती. ती त्यांचे शिष्य शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना पूर्ण केली.



परंतु त्यापूर्वीच 22 जानेवारी 1972 राेजी दुपारी 3.25 मिनिटांनी त्यांचे हैदराबाद येथे निर्वाण झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अंबाजाेगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयास त्यांचे नाव देण्यात अाले. नांदेडच्या पिपल्स काॅलेजचे ते संस्थापक हाेते. तेथील विद्यापीठासही त्यांचे नाव देण्यात अाले असून हैदराबादला बेगमपेठ परिसरात त्यांचे समाधीस्थान, त्यांचे शिष्याेत्तम तथा माजी पंतप्रधान पी.व्ही. नृसिंहराव यांनी उत्कृष्ट प्रकारे विकसित केले आहे .

स्वामी रामानंद तीर्थसारख्या एका महान विभूतीचा परिचय  शब्दांत करणे  म्हणजेच आकाशाला गवसणी घालण्यासारखे होते.तसे ते शक्य नव्हते, परंतु त्यांचे धाकटे बंधु कै. भीमराव खेडगीकर ऊर्फ बेथूजी गुरूजी यांचे चिरंजीव डाॅ. शिरीष खेडगीकर यांनी त्यांचा तपशीलवार, माहितीपट दिल्यामुळे हे शक्य झाले. खेडगीकर घराण्यातील या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाची तेज आभा त्यांचे धाकटेबंधू अाणि माझे अादरणीय गुरूजी कै. बेथूजी गुरूजी, बेथूजी गुरूजींच्या पत्नी माई अाणि त्यांच्या घरातील सुरेशराव, डाॅ. मंदाताई, डाॅ. दिलीप, सुरेंद्र ,डाॅ. शिरीष यांच्याशी नेहमी चर्चेतून जाणवते. आम्हाला हे घरही आमचेच असल्यासारखे आजही जाणवते .तोच आपुलकीचा स्वर मग दिलीपराव असो ,सुरेंद्र असो की शिरीष..यांच्याशी बोलतांना जाणवतो  त्यामुळे स्वामींजी जावून कांही वर्ष झाली असली तरीही तोच आपुलकीचा भाव प्रतिध्वनीत होत असतो..

 असा या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाला

 अंत:करणपूर्वक वंदन  मी करत अाहे...


© जगदीश पिंगळे/अंबाजोगाई/बीड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या