Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तीन तरुणांनी केली पोलिसाला मारहाण▪अंबाजोगाईतील घटना; आरोपी अटकेत


अंबाजोगाई  येथे लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू असतानाही मोरेवाडी परिसरात रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तीन तरुणांना अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस नाईक गोविंद येलमाटे यांनी हटकले. याच राग आल्याने त्या तिघा तरुणांनी येलमाटे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. त्या तिन्ही तरुणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घरात बसावे यासाठी प्रशासनाकडून सतत जनजागृती सुरु आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत अंबाजोगाई शहरात अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसून येतात. यात तरुणांची संख्या अधिक आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गोविंद अंगद येलमाटे हे एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मोरेवाडी परिसरातील यशवंत नगर भागात गेले होते. यावेळी त्यांना किशोर कालिदास लोमटे, वैभव बाबू आखाते (दोघेही रा. मोरेवाडी), आणि तुषार नानासाहेब शिनगारे (रा. आवसगाव, ता. केज) हे तीन तरुण संचारबंदीचे आदेश डावलून रस्त्यावर उभे राहून गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे येलमाटे यांनी त्या तरुणांना रस्त्यावर का थांबलात असा सवाल केला. याच राग आल्याने त्या तरुणांनी येलमाटे यांना चापाटाने मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही तरुणांवर कलम ३५३, ३३२, १८८, २६९, २७०, ५०४, ३४ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहेत. 

‌▪ *‘खाकी’च्या माणुसकीला मारहाणीचे ‘बक्षीस’ :*
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच गोविंद येलमाटे यांना बंदोबस्तावर असताना एक अंध कलावंत गुजराणीसाठी रस्त्यावर सारंगी वाजवत फिरताना दिसून आला. परंतु, संचारबंदीमुळे रस्ता निर्मणुष्य असल्याने त्याला कसलीही मदत मिळत नव्हती. त्याची बिकट परिस्थिती लक्षात आल्याने येलमाटेंनी त्याला दोन महिन्याचा किराणा देऊन खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले होते. याची दखल अनेक वृत्तपत्रांनी घेतल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, अवघ्या दोन दिवसातच त्यांच्यावर कर्तव्य बजावताना हल्ला झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

विवेक सिंधु न्यूज