बीड // राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, चतुर्थ श्रेणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नावाचा दुरूपयोग करून उद्याचा लाक्षणिक संप आणि ११ सप्टेंबर पासूनचा बेमुदत संपाशी समन्वय समितीचा काहीही संबंध नाही, हा संप समन्वय समितीने पुकारला नसल्याने या संपात सहभागी न होण्याचे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी मध्यवर्ती समितीचे जिल्हा सरचिटणीस नवनाथ नागरगोजे यांनी केले आहे.
जिल्हा समन्वय समितीचे प्रसिध्दी प्रमुख राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की २००५ नंतर नियुक्त कर्मचारी शिक्षकांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गाच्या वेतन त्रुटी वेतन सुधारणा खंड २ प्रकाशित करा, रिक्त पदे भरा या व इतर मागण्यासाठी समन्वय समितीने २० आॅगष्ट २०१९ रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. परंतु महाराष्ट्रात आलेला महाप्रलयंकारी पूर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणातील सर्व जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने सर्वांना विश्वासात घेऊन संप स्थगित केला आहे.
समन्वय समितीच्या या निर्णयाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत संबंधितांना मागण्यांबाबत समन्वय समिती बरोबर चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत ,त्या प्रमाणे चर्चेच्या दोन फे-या झाल्या आहेत. पूर परिस्थितीतून महाराष्ट्र अद्याप सावरेलला नसल्याने समन्वय समितीने संपाची हाक दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक यांनी संपात सहभागी होऊ नये असे आवाहन समन्वय समितीचे निमंत्रक नवनाथ नागरगोजे, राज्य सरकारी मध्यवर्ती समितीचे जिल्हाध्यक्ष ए.बी. राऊत, समन्वय समितीचे प्रसिध्दी प्रमुख राजकुमार कदम यांनी केले आहे.
Social Plugin