Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईजवळ तिहेरी अपघातात लातूरला शिक्षणासाठी असलेल्या मुलांना भेटण्यास जाणारे दांपत्य ठार ; पाच जण जखमी




अंबाजोगाई //  लातूर रोडवरील नंदगोपाल दूध डेअरीसमोर दोन कार व रिक्षा असा तिहेरी भीषण अपघात होऊन एका कारमधील दांपत्य जागीच ठार झाले तर अन्य पाच जण जखमी झाले. मृतात बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी दिपक सवडतकर यांचा समावेश असून केजचे पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि.१०) सायंकाळी साडेसात वाजता झाला.

ज्योती दीपक सवडतकर (४०), दीपक त्र्यंबक सवडतकर (४४, दोघे रा. चिखली जि. बुलडाणा) असे मयत दांपत्याचे नाव आहे. ज्योती या शिक्षिका तर दीपक हे गट शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत होते. ते दोघे कारमधून (एमएच २८ एझेड ११३४) मधून लातूरला शिक्षणासाठी असलेल्या मुलांना भेटण्यास जात होते. शहराजवळील नंदगोपाल दूध डेअरीसमोर  अंबाजोगाईकडे येत असलेल्या रिक्षाला ओव्हरटेक करणाारे केजचे पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला यांच्या कारची (एमएच २४ व्ही ००१२) आणि सवडतकर दाम्पत्याच्या कारची समोरासमोर जोराची धडक झाली  अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सवडतकर दांपत्य जागीच गतप्राण झाले. यावेळी रिक्षाही कारवर आदळला. यात राजू बाळू उपाडे, संजय विठ्ठल जोगदंड (दोघे रा. परळीवेस, अंबाजोगाई), तसेच सवतडकर दांपत्याच्या कारचा चालक  गजानन कुंडलिक निंबाळकर (वय ४५) व विनोद तेजराव जाधव (वय ४०, दोघे रा. चिखली जि. बुलडाणा) आणि सुनील श्रीनिवास बिर्ला (५०, रा.  लातूर) हे सर्व जण गंभीर जखमी झाले. स्वाराती रूग्णालयातील १०८ रूग्णावाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात एवढा भीषण होता की, तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातातील मयत व जखमी यांना बाजूला काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.  बर्दापूर ठाण्याचे सहा. निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

विवेक सिंधु न्यूज