Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आधार महोत्सव ! 'आम्हा गरिबांच्या माथी , छ्ळ मांडलास मेघा, काळजाच्या झडपाला, किती पाडशील भेगा' !



परळी // माजी उपमुख्यमंत्री तथा विधीमंडळ गटनेते आ.अजित पवार व ना .धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आधार महोत्सवांतर्गत लोकनेते नटराज रंग मंदिर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवींचे महाकवि संमेलन संपन्न झाले.कर्णमधुर अभिव्यक्तीने दर्जेदार महाकवीसंमेलन रंगले. सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या 'आम्हा गरिबांच्या माथी , छ्ळ मांडलास मेघा, काळजाच्या झडपाला, किती पाडशील भेगा' या कवितेने उपस्थितां च्या ह्रदयाचा ठाव घेतला.
    महाकवीसंमेलनात कवी सर्वश्री अरुण म्हात्रे मुंबई, प्रा. सुरेश शिंदे करमाळा, आरविंद भोंडे अकोला, शरद धनगर अंमळनेर, चंद्रशेखर मलकमपट्टे उदगीर, अलका तालनकर आमरावती, विलास आडवळे जुन्नर, अरुण पवार परळी वैजनाथ हे  सहभागी झाले होते.यावेळी साहित्यिक दगडू लोमटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध आशयाच्या कवितांची पेशकश कवींनी केली.यामध्ये मेळघाट चिखलदरा येथे असलेल्या शिक्षिका अलका तालनकर यांनी_
 " आम्हा गरिबांच्या माथी
छ्ळ मांडलास मेघा
काळजाच्या झडपाला
किती पाडशील भेगा
 येता दारी वावटळी
येतो उधानला वारा
भेगाळल्या वावरात
कधी बरसाव्या धारा "
अशी शेतकऱ्याची व्यथा मांडणारी हृदयस्पर्शी कविता गेय पद्धतीने सादर करून करुण वातावरण निर्मिती तर केलीच ;पण कर्णमधुर अभिव्यक्तीने रसिक श्रोत्यांची मनेही जिंकली . यावेळी त्यांनी सादर केलेल्या ' माहेर ' या कवितेलाही तितकीच दाद मिळाली . अंमळनेर येथून आलेल्या शरद धनगर यांनी-
  '' की पडक्या घरास माझ्या
साधी कमान नाही
माझे इमान कोण्या
दारी गाहण नाही "
यासारख्या दमदार गझला सादर करून आपल्या गझलेतील शक्तीस्थळाची प्रचिती दिली . उदगीर येथून आलेल्या चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी _
  " माय बाई आता एक कर
या तापल्या उन्हात
वाळत घाल तुझा गर्भार देह
आणि खालावू दे पातळी
तुझ्या गर्भजलाची
 निदान तुझ्या पोटातल्या
अभिमन्यूला ट्रेनिंग तरी मिळेल
कोरडवाहू चक्रव्युहासोबत झुंजायची . "
अशी कृषकाची विदारक व आर्त जाणीव असलेली कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले . जुन्नर येथून आलेल्या विलास हाडवळे यांनी _
" मला पुण्याचा आणावा गजरा " ही लावणी  व " शेतकरी राजा तू सर्वांचा शिकारी
राजा असून राज्यात तूच भिकारी
वादळात नौका तुझी बेसाह-यापरी
नाही जगी तुझा कोणी कोणी कैवारी "
अशी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता रसिकांना भावणारी कविता सादर केली .
     झी .टी.व्ही. वरील 'हास्यसम्राट ' फेम अरविंद भोंडे यांनी भन्नाट विनोदाच्या माध्यमातून हास्यतुषार उडवले . त्यांनी " कोण म्हणतं भारत महान नाही " या कवितेतून भारताचं वैभवशाली रूप श्रोत्यासमोर ठेवलं, तर-
" एकदा एका नेत्याले
कुत्र्यानं डसलं
भुंकणं सोडून तवापासून
चौकाचौकात भाषण देत बसलं. "
अशी राजकारणावर उपहासात्मक विनोदी कविता सादर करून  हास्यरसाचा आविष्कार केला .परळीचे कवी अरूण पवार यांनी _
" चरणाची ती धुळ होऊनी
 सोबत आली जातीनं
 बापाला मग पडता पडता
सावरलं की मातीनं "
अशी मातीची महती सांगणारं मातीचं गाणं सादर केलं .प्रा . सुरेश शिंदे यांनी  ' मतांचे पीक ' या कवितेत-
" मतांचे पीक भरघोस  हवे असेल तर
दुष्काळात कायम होरपळणारी जमीन निवडावी
रोजगार , चारापाणी, वीज , शिक्षण
यांची बोंबाबोंब पाळावी
राजकीय कुपोषणाचा कुंदा भारी जाचक असतो
त्याच्यावर गोल गोल नांगरी घ्यावी
अन फोडाफोडीच्या कुळवानं
उभी -आडवी पाळी द्यावी " .
अशा ग्रामीण प्रतिमांच्या माध्यमातून राजकारणावर उपरोधिक भाष्य करत  सभागृहात हास्यही पिकवलं. त्याचबरोबर -" आज काल पाऊस माणसासारखा वागू लागला " या कवितेतून पावसाचे बदलते रूप मांडतानाच माणसातील खोटेपणावर हल्ला चढविला .
       कविसंमेलनाचं बहारदार सूत्रसंचालन करणाऱ्या कवी अरूण म्हात्रे यांनीही यावेळी दोन कविता सादर केल्या . त्यातल्या त्यात ' उंच माझा झोका ' या मालिकेचं शीर्षक गीत असलेली _
" चांदण चाहूल होती
कोवळ्या पाऊली
माप मी ओलांडले
अन् दूर गेलीभातुकली
खेळण्याचे होते वय,
अंगणाची होतीस य
सोवळ्या मनात माझ्या
भरे नभाचा आशय
हाती अमृताचा वसा ,
साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात
झुले उंच माझा झोका . "
 ही कविता रसिक मनात दीर्घकाळ गुंजारव घालत होती  तब्बल अडीच तास चाललेल्या या कविसंमेलनात विविध रसाची अनुभूती परळीकर रसिकांना आली .
        यावेळी आधार महोत्सव च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी यांच्या वतीने उपस्थित मान्यवर व कवींचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमास युवकनेते अजय मुंडे,मोहन सोळके,बाजीराव धर्माधिकारी, अय्युब पठाण,सुरेश टाक, जाबेर खान पठाण,केशव बळवंत,रजाक कच्छी, अनंत ईंगळे,महादेव रोडे,श्रीकृष्ण कराड, गोपाळ आंधळे,विजय भोयटे,शंकर आडे पावर, जयप्रकाश लड्डा,अझिझ कच्छी, दत्ता सावंत,रघुनंदन खरात, सुनील चव्हाण, जमिल अध्यक्ष, अजय जोशी, मनजीत सुगरे,दिनेश गजमल,सतीश काळे,शेख मुख्तार,अन्नपूर्णा जाधव,अर्चना रोडे,पल्लवी भोयटे, के.डी. उपाडे, सुभाष वाघमारे,रवी मूळे, बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे, मंगेश मुंडे,लाला खान पठाण, शंकर कापसे, चंद्रप्रकाश हालगे, शकील कच्छी, रंगनाथ सावजी,सचिन मराठे, अमोल वाळके,शरद कावरे,माऊली होळंबे, सय्यद फेरोज,शेख शम्मो,शामसुंदर दासूद, श्रीहरी कवडेकर एस.के.गित्ते एस.व्ही. शेप, जितेंद्र नव्हाडे, श्रीपाद पाठकसुरेश नानावटे, रामदास कराड प्रताप समीनदरसवळे,राज जगतकर, बबलू साळवे,वैजनाथ जोशी,सुरेश भातागळे,अमर ताटे,तौफिक कच्छी,आरगडे सर,शरद चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.