Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत चालकाविना धावली ‘शिवशाही’ ! ▪ आगाराच्या प्रवेशद्वाराला धडकून बस थांबल्यामुळे मोठी दुर्घटना टळली




▪ अंबाजोगाई //  येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस आगारात उभी असलेली शिवशाही बस अचानक सुरु झाली आणि उतारामुळे थेट प्रवेशद्वाराला जाऊन धडकली. या अपघातात एक चालक जखमी झाला असून बस आणि प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, बस प्रवेशद्वाराला धडकून न थांबता बाहेर रोडवर आली असती तर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, हि बस आपोआप सुरु झाली कि कोणी ती सुरु केली याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेली ‘शिवशाही’ बस सेवा सुरुवातीपासूनच कायम नकारात्मक चर्चेत आहे. अनेक अपघात, असुरक्षित प्रवास आणि नादुरुस्त गाड्या यामुळेच शिवशाही अधिक गाजली. अंबाजोगाई आगारातील शिवशाही गाड्या सतत आजारी असतात. त्यापैकीच एक असलेली एमएच ०६ बीडब्ल्यू ०६४६ ही शिवशाही गाडी वातानुकुलीत यंत्रणा बंद पडल्यामुळे मुंबईला पाठविण्यात आली होती. गुरुवारी सकाळीच ही गाडी दुरुस्त होऊन आली आणि आगारात प्रवेशद्वारासमोर लावण्यात आली होती. सायंकाळी ६.३० वाजता ही बस अचानक सुरु झाली. उतारावर उभी असल्याने ती सरळ प्रवेशद्वारातून बाहेर मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाली. परंतु, अंबाजोगाईकरांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस प्रवेशद्वाराला धडकली आणि तिथेच थांबली. आगारासमोरचा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. ही बस तशीच वेगात मुख्य रस्त्यावर गेली असती मोठी दुर्घटना घडली असती. बसचा वेग एवढा होता कि या अपघातात लोखंडी प्रवेशद्वार आणि काठड्याची भिंत दोन्ही कोसळून खाली पडले आहे तर समोरची काच फुटून आणि पत्रा तुटल्यामुळे बसचे जवळपास २० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले अंबाजोगाई आगारातील चालक ए.एच. मोरे हे बसच्या धडकेत किरकोळ जखमी झाले आहेत.

▪ बस आपोआप सुरु झाली कि केली?
ही बस हॅन्डब्रेक लावून उभी केलेली होती. बस आपोआप सुरु झाली कि कोणी केली याचा अद्याप उलगडा झाला नाही. बस आपोआप सुरु होऊ शकत नाही असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. मग बसमध्ये जाऊन बस सुरु करून आणि हॅन्डब्रेक काढून ती रस्त्याच्या दिशेने जाऊ देण्यामागे कोणाचा काय उद्देश होता हे समोर येणे आवश्यक आहे. अनेकांचा जीव धोक्यात घालणारा तो व्यक्ती आगारातीलच आहे कि बाहेरचा याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, मात्र उशिरापर्यंत त्यातील फुटेज मिळू शकले नव्हते.

▪ “या घटनेची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेसाठी जिम्मेदार व्यक्ती कोण हे समजू शकेल. हे फुटेज मी स्वतः मुंबई येथे घेऊन जाणार आहे. दोषीवर कारवाई करण्यात येईल”
- शिवराज कराड, आगार प्रमुख, अंबाजोगाई.