Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान !! अंबाजोगाईत एक तोळ्याच्या बदल्यात चार तोळे सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त शिक्षकास लुबाडले

अंबाजोगाई //रुग्णालयात दाखल नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत. माझ्याकडे चार सोन्याची बिस्किटे आहेत, मात्र पावती नाही. त्यामुळे चार तोळ्याच्या बिस्किटाच्या बदल्यात तुमची अंगठी मला द्या, असे म्हणून दोन व्यक्तींनी अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

ज्ञानोबा कांबळे (रा. बलुतीचा मळा, अंबाजोगाई) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शुक्रवारी दुपारी पंचायत समितीलगतच्या दुकानातून ते मटन घेऊन बाहेर पडले असता अनोळखी दोघे त्यांच्याजवळ आले. आमचे नातेवाईक रुग्णालयात अॅडमिट असून उपचारासाठी तातडीने पैशाची आवश्यकता आहे असे त्यांनी कांबळे यांना सांगितले. मात्र, आमच्याकडे रोख रक्कम नसून फक्त चार तोळे सोन्याचे बिस्कीट आहे. परंतु, आमच्याकडे पावती नसल्याने ही बिस्किटे आम्ही विकू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कांबळे यांच्या हातात ३० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. चार बिस्किटांच्या बदल्यात आम्हाला तुमची अंगठी द्या, अंगठी विकून आम्ही पैसे घेऊ, असे म्हणत त्यांनी कांबळे यांना या व्यवहारासाठी राजी केले. तुम्ही अंगठीची पावती घेऊन येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो असेही ते म्हणाले. परंतु, पावती नसल्याचे सांगत कांबळेंनी एक तोळा सोन्यात चार तोळे सोने मिळत असल्याने हा व्यवहार केला. त्यानंतर ते दोघे अंगठी घेऊन तिथून निघून गेले आणि कांबळे यांनी सोनाराचे दुकान गाठले. सोनाराने बिस्कीट तपासून ते पितळेचे असल्याचे सांगताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यात धाव घेत कांबळे यांनी दोन्ही भामट्याविरोधात तक्रार दिली.