मुंबई // मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशाची दुसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र त्याबद्दल कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून अद्याप मिळाली नाही.
२० मेपासून दुसरी फेरी सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र ती न झाल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरटीईची तिसरी फेरी जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून वेळेत पूर्ण होणार नसल्याची चिन्हे आहेत. यामुळे आरटीई २५ टक्के प्रवेशाचे वेळापत्रक यंदाही दरवर्षीप्रमाणे कोलमडणार का, असा सवाल शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करत आहेत.
आरटीईच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनुदानित शिक्षा बचाव समितीकडून पालकांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत येत्या २९ मे रोजी शिक्षण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश देणे तसेच दुसरी फेरी लवकर जाहीर करणे हे या मोर्चाचे मुख्य विषय असणार आहेत.
>प्रवेशाचा तपशील
यंदा राज्यातील ९ हजार १९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ७७९ प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीत राज्यातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. परंतु त्यातील ४४ हजार ९८३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
Social Plugin