अंबाजोगाई // अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या निवडीत भाजपच्या नगरसेविका सविता शशिकांत लोमटे यांना २२ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंदडा गटाचे शेख खलील जलील यांना ६ मते मिळाली. सविता लोमटे यांचा दणदणीत विजय झाला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात मतदान केल्यामुळे या नगरसेवकांच्या विरोधात पक्षीय पातळीवर अहवाल पाठवणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शेख रहीम यांनी सांगितले.
अंबाजोगाई नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५, काँग्रेस पक्षाचे ७ असे आघाडीचे २२ नगरसेवक असतांनाही केवळ ६ नगरसेवक असणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीच्या गटबाजीचा फायदा घेत उपनगराध्यक्षपद मिळवले. बुधवारी दुपारी उपनगराध्यक्ष पदाची प्रक्रिया नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वतीने सविता शशिकांत लोमटे तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंदडा गटाच्या वतीने शेख खलील जलील अशा दोघांनी आपले अर्ज दाखल केले. लोमटे यांच्या बाजूने २२ तर शेख खलील यांच्या बाजूने ६ मते राहिली. या मतदान प्रक्रियेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका जयश्री पृथ्वीराज साठे या दूर राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
७ मे रोजी काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादीतील ९ नगरसेवकांनी एकत्रित येऊन उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला तो संमतही झाला. त्यानंतर काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी (साठे गट) या तिघांनी प्रत्येकी ९ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेण्याचा अलिखित ठराव केला. तशा चिठ्याही काढल्या पहिल्याच चिठ्ठीत भाजपचे नशीब उजळले. भाजपमध्ये असणाऱ्या सहा नगरसेवकांपैकी पाचजण उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र, पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. संगिता ठोंबरे यांनी सविता लोमटे यांच्या नावाला संमती देत उपनगराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली.
▪ पक्षाकडे अहवाल पाठवणार - शेख रहीम
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालिकेत बहुमत असतानाही भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने युती करून मुंदडा गटाला शह देण्याचे काम केले आहे. पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडून येऊनही पक्षाच्या विरोधात उपनगराध्यक्ष निवडीत मतदान केलेल्या नगरसेवकां विरोधात पक्षाकडे अहवाल पाठवणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शेख रहीम यांनी सांगितले आहे.
विवेक_सिंधु_न्यूज
Social Plugin