●
परळी वैजनाथ // सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय झालेल्या 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून परळीचा युवा कलाकार परमेश्वर गुट्टे छोट्या पडद्यावर झळकतोय. या मालिकेतील त्याने साकारलेली भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. कला क्षेत्रात आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्याने ठसा उमटविला असुन परळीसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच संत बाळूमामा यांच जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेमध्ये संत बाळूमामा यांची भूमिका साकारणारा समर्थ, सुंदरा (बाळूमामांची आई) अंकिता, मयप्पा (बाळूमामाचे वडील) तसेच पंच – पंच बाई, देवऋषी या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. यामध्ये बाळुमामाचा निस्सीम भक्त मलप्पा या भूमिकेतून परमेश्वर गुट्टे प्रेक्षकांसमोर आला आहे.
या मालिकेतील कलाकार, कथा, अभिनय, शीर्षक गीत या सर्वांनाच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने संत बाळूमामांचे अनेक पैलू त्यांच्या भक्तांना पुन्हा एकदा बघण्याची संधी मिळत आहे. बाळूमामांचे हजारो अनुयायी त्यांच्यापुढे आजही नतमस्तक होतात. बाळूमामांच्या मेंढ्याचे कळप अतिशय शुभ मानले जातात. त्यांच्या देवस्थानी त्यांचे अनेक भक्त त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याकरता जातात. हजारो लोकांना आधार देणाऱ्या असाधारण माणसाचे म्हणजे संत बाळूमामांचे चरित्र या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळत आहे.
@@@
परळीचा कला क्षेत्रात ठसा. .......!
परमेश्वर गुट्टे या युवा कलाकाराच्या माध्यमातून कला क्षेत्रात परळीचा ठसा उमटविला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात अनेक कलाकार चांगल्या संधीसाठी स्ट्रगल करत असतात. परळीचा रहिवासी असलेला सर्व सामान्य घरातून पुढे आलेला परमेश्वर गुट्टे हा युवक ही अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सातत्याने धडपड करत होता.'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून परमेश्वर गुट्टे ला चांगली भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्याने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. रविवारी या मालिकेच्या झालेल्या दोन तासांच्या विशेष भागात परमेश्वर गुट्टेने साकारलेल्या व्यक्तिरेखे भोवती संपूर्ण कथानक होते. आपल्या प्रभावी अभिनयाची चुणूक या माध्यमातून त्याने दाखवून दिली आहे.
Social Plugin