Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड लेखा विभागातील जांगडगुत्यामुळे ! बीडचा मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; १२०० रुपयांची लाच स्विकारताना पकडला .




बीड // जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सातव्या वेतन आयोगाच्या फाईलवर सही करुन ती पुढे पाठवण्यासाठी १२०० रुपयांची लाच स्विकारताना ही कारवाई आज प्राथमिक शाळेच्या परिसरात करण्यात आली.

एकनाथ गोरखनाथ लाड (वय-५१) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्षक तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

एकनाथ लाड हा पाटोदा तालुक्यातील वाहली प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्य़रत आहेत. तक्रारदार यांनी लाड यांच्याकडे सातव्या वेतन वाढीच्या फाईलवर सही करुन ती फाईल लेखा विभाग बीड येथे सादर करण्यासाठी दिली होती. फाईलवर सही करण्यासाठी आणि फाईल लेखा विभागाकडे पाठवण्यासाठी लाड याने तक्रारदार यांचे कडे १२०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी बीड लाचलुचपत विभागाकडे ३० मार्च रोजी तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज वाहीली प्राथमिक शाळेच्या परिसरात पथकाने सापळा रचला. लाड याला १२०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एकनाथ लाड याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई औरंगाबाद विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन वाघ आणि बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.