दारुड्या पतीने गर्भवती पत्नीचा गळा आवळून केला खून
केज // चार महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीचा दारुड्या पतीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे रविवारी रात्री घडली. त्यानंतर त्या दारुड्याने बाळांतपणासाठी पत्नीस रुग्णालयात घेऊन जायचे आहे असे सांगून १०८ रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आल्यानंतर तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
काजल ज्ञानेश्वर गोरेमाळी (वय २५, रा. बनसारोळा) असे त्या विवाहितेचे नाव आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी मोहा येथील काजलचा विवाह तीन वर्षापुर्वी बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरे याच्यासोबत झाला होता. काजल आणि ज्ञानेश्वरला दोन वर्षाची एका मुलगी असून सध्या काजल दुसऱ्यांदा चार महिन्यांची गर्भवती होती. विवाहानंतर काही दिवस सुखाचे गेल्यानंतर ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडले होते. काल रविवारी देखील तो दारु पिऊन दिवसभर पत्नीला मारहाण करत होता. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास नळास पाणी आल्याने पत्नी काजल ही पाणी भरण्यासाठी जात असताना पती ज्ञानेश्वर गोरेने तिला मारहाण करत तिचा गळा दाबून खून केला.
▪ बाळंतपणाचा बहाणा करून बोलावली रुग्णवाहिका :
खुन केल्यानंतर ज्ञानेश्वरने 108 नंबरवर फोन करुन पत्नीस बाळांतपणासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून रुग्णवाहिका बोलावुन घेतली. रुग्णवाहिका आल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी केली असता काजल मृत आढळून आली. त्यांनी ही माहिती युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी रात्री बनसारोळा येथे धाव घेत पंचनामा करून काजलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बनसारोळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला. दरम्यान, घटनेनंतर ज्ञानेश्वर गोरेमाळी हा फरार झाला असल्याचे समजते.
▪ दोन वर्षीय मुलीचे भविष्य अंधारात :
मयत काजलची पहिली मुलगी अवघी दोन वर्षांची आहे. ज्ञानेश्वरने पत्नीचा खून केल्याचे न्यायालया समोर निष्पन्न झाले तर त्याला उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता आहे. तसेच काजलचे आई-वडील देखील हयात नाहीत आणि ज्ञानेश्वरचे आई-वडील वृद्ध आहेत. त्यामुळे बापाच्या दारूच्या नादापायी त्या चिमुरडीचे भविष्य अंधारात गेले आहे.
==========================अधिक बातम्यांसाठी वाचा ‘दै.विवेक सिंधु’
Social Plugin