Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कटकारस्थान रचून आमच्या देशात अस्थिरता निर्माण करणं अशक्य - पंतप्रधान मोदी


@शेजारील देशानं मोठी चूक केली, याची किंमत चुकवावी लागणार - पंतप्रधान मोदी


दिल्ली // केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडसावले आहे.

पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, ''दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार असून दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणाऱ्यांना या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. शेजारील देशांचे कुटील मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भ्याड हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल''.

''जागतिक स्तरावर एकट्या पडलेल्या शेजारील देशाला वाटत असेल की, अशा प्रकारच्या षड़यंत्रांमुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल, तर तसे कदापि शक्य होणार नाही. 130 कोटी देशवासीय अशा प्रकारच्या कटकारस्थानांविरोधात आणि भ्याड हल्ल्यांविरोधात सडेतोड प्रत्युत्तर देतील.'', असेही मोदींनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, आपला देश एकजूट आहे, फक्त राजकारण करू नका, असं आवाहनही यावेळेस पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.