गणेशोत्सवाच्या खर्चातून 5 कुटुंबांना शौचालय बांधून देणार -डॉ. राजाराम मुंडे
परळी वैजनाथ /प्रतिनिधी.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले टोकवाडी येथील वरद गणेश मंडळ यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या खर्चातून इतर कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता गावातील गरजू पाच कुटुंबासाठी शौचालय बांधून देणार आहे अशी माहिती वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष राजाराम मुंडे यांनी दिली आहे.
परळी तालुक्यातील टोकवाडीचे वरद गणेश मंडळ हे सातत्याने सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवते. या गणेश मंडळाच्या माध्यमातून गावात समाज उपयोगी व लोकोपयोगी उपक्रम नेहमीच घेण्यात येतात. आपले गाव हागणदारी मुक्त करण्याची चळवळ याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यापूर्वी मंडळाच्या वतीने सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहेत. तसेच नेहमी स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे आदी उपक्रमही राबवले जातात. यावर्षीच्या गणेशोत्सवावर होणारा खर्च सत्कारणी लावण्याच्या दृष्टीने समाजाची जबाबदारी म्हणून वरद गणेश मंडळाने गावातील गरजू पाच कुटुंबांसाठी शौचालय बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचा एक प्रकारे हा स्तुत्य उपक्रम असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वरद गणेश मंडळाच्या वतीने सातत्याने घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांसाठी वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजाराम मुंडे व सर्व पदाधिकारी, सदस्य नेहमीच पुढाकार घेतात.
Social Plugin