Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'धनंजय' यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल

 आपला ई पेपर /केज प्रतिनिधी


मस्साजोग येथील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या शासकीय अंगरक्षकाचे अधिकृत पिस्टल काढून एका व्यक्तीच्या डोक्याला लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी समाधान खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणात एका साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाच आता थेट पीडित कुटुंबातील मुख्य सदस्यावरच गंभीर गुन्हा नोंदवल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी धनंजय देशमुख यांनी अचानक त्यांच्या शासकीय अंगरक्षकाची पिस्टल काढून घेतली आणि ती थेट खिंडकर यांच्या डोक्याला लावली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी थेट धमकी देत त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावले उचलत गुन्हा दाखल केला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे संबंधित तपास अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून धनंजय देशमुख यांच्यासोबत शासकीय अंगरक्षक तैनात करण्यात आला होता. मात्र, त्याच शासकीय सुरक्षेचा आणि शस्त्राचा गैरवापर करून धमकी दिल्याचा गंभीर आरोप आता समोर आल्याने पोलीस प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. आरोपीने अंगरक्षकाचे शस्त्र नेमके कशासाठी आणि कोणत्या वादातून काढले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

#BeedCrime #SantoshDeshmukhCase #BeedPolice #MaharashtraCrime #CrimeNews