स्व.श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोहांतील व्याख्यानमालेत श्री अरविंद जगताप यांचे वक्तव्य
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
येथील महिला महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या स्व. श्यामरावजी देशमुख स्मृति समारोहाच्या समारोपदिनी मुंबई येथील थोर चित्रपट पटकथा लेखक व चित्रपट गीतलेखक सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री अरविंद जी जगताप यांचे व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. *अनिलरावजी देशमुख* यांची विशेष प्रेरणा
लाभली.
समारोपसत्रातील या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा संजयजी देशमुख तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव मा रवींद्र देशमुख व प्रा प्रसाद देशमुख संस्थेच्या संचालिका सौ. छायाताई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . विद्याताई देशपांडे यांची उपस्थिती होती .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कोषाध्यक्ष मा. प्रा. प्रसाद देशमुख सर यांनी प्रभू वैद्यनाथाच्या सानिध्यामुळे अध्यात्मिकदृष्ट्या परळीला एक वेगळं असं महत्त्व आहे ; पण वेगवेगळ्या साहित्यिकांच्या कलाकारांच्या येण्यामुळे व अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परळीचं सांस्कृतिक आणि कलात्मकदृष्ट्या असलेले हे वैभव पुनश्च परळीला प्राप्त होईल अशी आमच्या सर्वांची येथे नक्कीच खात्री झालेली आहे . असे सांगून
कलाकार हा जितका मोठा असतो तितका तो नम्र - तितका विवेकशील आणि तितकाच प्रतिभा संपन्न असतो . असे उद्गार आपल्या प्रास्ताविकात काढले .
यानंतर परळीतील सांगीतिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले श्री चंद्रकांत कळसे गुरुजी यांच्या *अध्यात्म आणि संगीत* पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मा श्री . अरविंदजी जगताप यांनी आपल्या सहज सुलभ सुबोध ओघवत्या पण सौम्य विनोदी शैलीत जीवनांतील छोट्या छोट्या पण डोंगराएवढे महत्व असलेल्या अनेक विचारांची मांडणी केली .
१९६८ मध्ये मराठवाड्यातील पहिली इंग्रजी शाळा परळी येथे श्यामरावजी देशमुख (काकांनी ) लिटल फ्लॉवर नावाने स्थापन केली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असे ते म्हणाले .
शिक्षणात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की , विद्यार्थी व शिक्षक यांचा त्याग. आणि त्यातून अशा संस्था उभ्या राहत असतात . यशस्वी माणसांनी गुणवंत माणसं निवडली पाहिजेत तर ती यशोगाथा मोठी होते . पण जर तुम्ही भलतीच माणसं निवडत गेला तर त्याची वाताहात व्हायला वेळ लागत नाही .
आपला स्मार्टफोन हा सतत स्मार्ट होत आहे ; पण त्याच्याबरोबर आपण मूर्ख होत चाललोय .राजकीय क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारा बाबत बोलतांना ते म्हणाले की , बालपणी ५० पैशाचा हिशोब घेणाऱ्या आईबापांनी भविष्यात फक्त वार्डमेंबर बनलेल्या मुलाने मिळविलेल्या कोट्यवधी रुपयाविषयी जाब विचारला तर भ्रष्टाचार कमी व्हायला मदतच होईल . असे ते म्हणाले . तुळशीच्या पुढे दिवा लावताना जर प्रार्थना पाठ असेल तर त्या सोबतच बल्बचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव पण पाठ असलं पाहिजे तर अध्यात्माचा हात धरून विज्ञानाचा विकास होईल .
या त्यांच्या व्याख्यानामुळे परळीकर श्रोते हे मंत्रमुग्ध झाले . यानंतर श्री सिद्धेश्वर इंगोले यांनी स्व. श्यामरावजी देशमुख यांच्या रांगोळीतून साकारलेल्या प्रतिकृतीला दाद द्यावी म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर महाविद्यालयातील कु. श्रुती हाले हिने रांगोळीतून साकारलेल्या पाच कवींच्या प्रतिकृतीला दाद द्यावी म्हणून तिचाही सत्कार करण्यात आला. यानंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे व इतर स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालक मंडळापैकी सौ. विद्याताई देशमुख ,सौ स्नेहाताई देशमुख तसेच परळी मधील अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते .या व्याख्यान सत्रानंतर स्पर्धेतील पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
या सायंकालीन सत्राचे सूत्रसंचालन प्रा . डॉ अरुण चव्हाण व प्रा डॉ.गुट्टे पी व्ही यांनी केले . तर प्रा. डॉ एस.व्ही. कचरे यांनी आभार मानले . या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले .
Social Plugin