Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा शाळेचे नाट्य अभिवाचन महाराष्ट्रात द्वितीय




माजलगाव प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या 'नाट्यकलेचा जागर' स्पर्धा महोत्सवातील नाट्य अभिवाचन स्पर्धेच्या अंतिम फेरीत माजलगाव येथील सिंदफणा पब्लिक स्कूलने सादर केलेल्या लेखक विजयकुमार राख लिखित 'दगडूला पडलेला प्रश्न' या नाट्य अभिवाचनाने अंतिम फेरीत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच शाळेचे शिक्षक कृष्णा नवले यांना उत्कृष्ट नाट्य अभिवाचक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशासाठी शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलना निमित्त 'नाट्यकलेचा जागर' स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नाट्यछटा, एकपात्री, नाट्यवाचन, नाट्यसंगीत पद, बालनाट्य, एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत घेण्यात आलेल्या नाट्य अभिवाचन स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील एकूण २२ संघांनी सहभाग नोंदविला. सिंदफणा पब्लिक स्कूलच्या कला विभागाचे संचालक सखाराम जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक कृष्णा नवले, प्रवीण मडके व ललिता सोळंके यांच्या संघाने नाट्य अभिवाचन स्पर्धेत बीड विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सादर केलेल्या विजयकुमार राख लिखित 'दगडूला पडलेला प्रश्न' या नाट्य अभिवाचनास अंतिम फेरीत १५००० रुपये रोख बक्षीस असलेल्या द्वितीय पारितोषिकाने गौरविण्यात आले. तसेच कृष्णा नवले यांना उत्कृष्ट अभिवाचनासाठी २००० रुपये रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. 

शाळेच्या नाट्य अभिवाचनाला प्रेक्षकांनी तसेच परीक्षकांनी भरभरून दाद दिली. शाळेच्या नाट्य अभिवाचनाचे दिग्दर्शन कृष्णा नवले यांनी केले तर संगीत प्रवीण मडके यांनी दिले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात २ मे रोजी ही अंतिम फेरी पार पडली. शाळेच्या कला विभागाचे अभिनंदन करताना शाळेच्या सचिव मंगलाताई सोळंके म्हणाल्या की, शाळेचा कला व नाट्य विभाग मागील वीस वर्षांपासून कार्यरत आहे. नाट्य,कला, संगीत व नृत्य असे सर्व विभाग असलेली सिंदफना ही या परिसरातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य अन्वर शेख म्हणाले की, आम्हाला शाळेच्या कला विभागाचा अभिमान आहे. या विभागाच्या कार्यातून अनेक विद्यार्थी हे नाट्य, संगीत, कला व नृत्य क्षेत्रात आपले नाव करतील. यापुढे विविध मालिका, सिनेमे, शॉर्ट फिल्म यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचा कलाकार म्हणून सहभाग नोंदवण्यासाठी शाळा प्रयत्न करत राहील.

या यशानिमित्त संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या