Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंधश्रद्धा हेच त्यांच्या जगण्याचे साधन आहे...संवेदनाशून्य जगात लोककलावंतांचा संघर्ष..

 आपला ई पेपर  | special Dipawali 


 लोकसंस्कृतीच्या उपासकांच्या अस्तित्वाचे पुरावेच नाहीत.म्हणून आजही लोककलावंत  उपेक्षितचआहेत.देवीची उपासना करणारा पोतराजही याला अपवाद नाही. 'पोतराज' हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तुराजु या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु किंवा पोतू म्हणजे रेडा किंवा बोकड. बोकडाची बलिप्रक्रिया पार पाडणारा पोत्तुराजु अशीही त्याची ओळख दिली जाते.

कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र नेसलेला, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंगराची माळ बांधलेला आणि पायात खुळखुळ्या घातलेला हा किशोरवयीन पोतराज आज भेटला. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत 'सट सट' आवाज काढीत तो मरीआईच्या नावाने दान मागत होता.त्याच्याकडे पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. हा कसा व का पोतराज झाला असेल?या विषयी आमचे सन्मित्र संपादक रानबा गायकवाड यांच्यासोबत मी चर्चा केली. परिस्थिती,मजबुरी, लादलेली कुप्रथा यांच्या मुळे हतबल  होऊन हा पोतराज झाला असावा किंवा हे पोतराजपण त्याच्यावर लादले गेले असेल.आमची चर्चा सुरू होती. दान घेऊन तो निघून गेला.


 दिवाळीच्या सणात मशगुल होऊन चैन करणारे लोक एकीकडे आणि हा पोटाची खळगी भरण्यासाठी पाठीवर कोरडा ओढणारा पोतराज एकीकडे.

दिवाळीच्या सणात हे हमखास नजरेस पडतात. कला सादर करून दिवाळी फराळ,पैसे मागतात; परंतु संवेदनाशून्य असलेल्या काही लोकांच्या दारातून कधी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते, तर काही सहृदय असलेल्यांच्या घरातून त्यांच्या कलेला भरपूर दाद दिली जाते. 

डफडे वाजवत ,कोरडे ओढत  मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडनाचा मार्ग अवलंबतो.खरंतर पोट भरण्यासाठीचा हा संघर्ष असतो.  अंगाला डावी-उजवीकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वतःच्या अंगाभेवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वतःच्या मनगटाचा चावा घेणे इ. प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो. त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते.आजही हे चित्र बदललेलं नाही.

 आंध्रप्रदेशात मदगी किंवा मादगूड म्हणून ओळखला जाणारा हा समाज तमिळनाडू राज्यातही अस्तिवात आहे. महाराष्ट्रातही हे आढळतात पण अस्तित्वाचे पुरावे?

 देवीला पोतराज सोडण्याची पद्धत समाजातील अंधश्रद्धांचे देणे आहे.अंधश्रद्धेत सर्व पोतराज समाज बंदिस्त झालेला आहे. अंधश्रद्धा त्यांच्या जगण्याचे साधन आहे.

 आज एकविसाव्या शतकात मुंडके तुटल्यामुळे तडफडणा-या धडासारख्या महाराष्ट्रभर दिसणा-या या लोककलावंतांची अवस्था फारच बिकट  आहे.

शासनदरबारी या सगळ्यांना ‘भटके विमुक्त’ या कागदावरील विविध श्रेणीत स्थान मिळाले. शासनाने प्रत्येकाच्या कलेला जातीचे नाव दिले. डोंबारी, मसणजोगी, बहुरूपी यांना जातीची ओळख देऊन त्यांना आरक्षण देऊन शासन मोकळे झाले. गारुडी, मसणजोगी, नंदीवाले, डोंबारी, बहुरूपी यांना शासनाने आरक्षण दिले. मात्र या जमाती संघटित नाहीत, यांची नेमकी जनसंख्या उपलब्ध नाही. त्यात अंधश्रद्धेचा वेढा आणि आरोग्याची हेळसांड होत असल्याने ते किड्यामुंग्यांसारखे जगतात-मरतात. शिक्षण नाही, त्यामुळे आरक्षणासारखा शासकीय शब्द आजही त्यांच्या आकलनापलीकडे आहे. अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडत राहणा-या या लोककलावंतांना एकच आशेचा किरण तो म्हणजे शिक्षण....!

 समाजाच्या किडलेल्या मानसिकतेवर प्रभावी इलाज म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. मात्र त्यांना ना जातीचे प्रमाणपत्र ना जन्माचा दाखला. शासनाच्या लेखी यांच्याकडे अस्तित्वाचे पुरावेच नाहीत, मग यांना शाळेत कोण घेणार?

जातींवरआधारित भेदभाव रोखण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानात अनेक कलमं आहेत. संविधानाचं 15वं कलम जाती, धर्म, वंश, लिंग तसंच जन्मस्थानावर आधारित भेदभाव रोखतं. 16व्या कलमानुसार समान संधी मिळण्याबाबतही तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे.

लोककला जतन संवर्धन करण्यासाठी गळे काढणारे खूप आहेत.काही सन्माननीय अपवाद वगळता लोककलावंतांची हेळसांड होतांना दिसते.मात्र यात समाजाची भूमिका कोणती?

शासनदरबारी केली जाणारी उपाययोजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही. परिणामी त्या योजनांमुळे अपेक्षित असलेला बदल किंवा परिवर्तन दिसून येत नाही. या समाजाला घटनात्मक आरक्षण आणि उच्च शिक्षण  याच बरोबर 'माणूस' म्हणून सन्मानाने चरितार्थ चालवण्याचा हक्क शासनाने आणि समाजाने द्यावा.



✍🏻 *डॉ. सिद्धार्थ तायडे*

(लेखक,कला,साहित्य, संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या