मुंबई // तब्बल नऊ वर्षांनंतर राज्यात शिक्षक भरती होत आहे. राज्यात अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडली गेली. अखेर शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीत सुमारे १२ हजार शिक्षक पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सध्या राज्यात डीएड आणि बीएड केलेले अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत. ही बेरोजगारांची संख्या सुमारे सात लाखांपर्यंत आहे.
सध्या सरकारी आणि खासगी शाळांत शिक्षकांची सुमारे २५ हजारांवर पदे रिक्त आहेत, परंतु या वर्षी केवळ ५० टक्केच म्हणजे बारा हजार पदे भरली जाणार आहेत. शिक्षक भरतीसाठी शासनाने सहा वर्षांत पाच टीईटी परीक्षा घेतल्या. ही परिक्षा ६ लाखांवर उमेदवार बसले होते. त्यात फक्त १ लाख ९७ हजार शिक्षक उत्तीर्ण झाले. त्यानंतर अभियोग्यता चाचणी झाली. या दोन्ही परिक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम भरू शकतात.
राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्याठिकाणी उमेदवारांची परीक्षेतील गुणवत्तेवर थेट निवड होईल. खासगी शैक्षणिक संस्थेत शासनाने पाठविलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊनच भरती केली जाणार आहे.
दरम्यान, पवित्र पोर्टलवर शाळांचे प्राधान्यक्रम देताना पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडचणी प्रशासनाने दुर कराव्यात. तसंच शाळांचे प्राधान्यक्रम निवडल्यानंतर शिक्षकांची शाळांवर त्वरित नियुक्ती द्यावी, अशी मागणी डीएड, बीएड स्टुडन्ट असोसिएशनचे संतोष मगर यानी केली आहे.
Social Plugin