मुंबई // राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. या माध्यमातून एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अनेक उमेदवार व्हॉट्सॲपवरून प्रचार करण्यावर भर देत आहेत. उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया हॅडलर्स’ तसेच कार्यकर्त्यांकडून विविध ‘ग्रुप’ तयार करण्यात आले आहे व दररोज शहरातील लाखो लोकांपर्यंत विविध ‘ग्रुप्स’च्या माध्यमातून संदेश पोहोचत आहेत.
सोशल नेटवर्किंग साइटपैकी व्हॉट्सॲपवर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. मात्र व्हॉट्सॲप प्रचारावर नजर ठेवण्यासाठी ‘सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही.
व्हॉट्सॲपवरील संदेशांवर लक्ष ठेवणे कठीण
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या काळात खोट्या बातम्या आणि माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जात आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना आचारसंहिता आणि निवडणूक काळासाठी नियमावली बनवली आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरावरही आयोगाची करडी नजर असणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र व्हॉट्सॲपवर नेमक्या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही. शिवाय व्हॉट्सअॅप’वरील संदेशांवर लक्ष ठेवणे कठीण बाब आहे. व्हॉटस्अॅप वरून किती संदेश चालले आहे, हे सांगणारी यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ एखाद्या ‘ग्रुप’वर संदेश आला असेल आणि आपला क्रमांक त्यात असेल तर कुणी संदेश पाठविला, हे कळू शकते. मात्र प्रत्यक्ष वैयक्तिक क्रमांकाचे ‘ट्रॅकिंग’ करणे शक्यच नाही.
@ फेसबुकची कारवाई
सोशल मीडियावर फेक न्यूज आणि माहिती पसरवणाऱ्यांवर सोशल नेटवर्किंग साइट फेसबूककडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून फेसबुक दिवसाला १० लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. मागील आठवड्यात फेसबुकने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास ७०० पेज, ग्रुप आणि अकाऊंटवर कारवाई केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी निगडित असलेल्या सिल्व्हर टच या आयटी कंपनीशी संबंधित असलेली १५ पेज आणि अकाऊंट्स फेसबुकवरून हटवली आहेत
Social Plugin