Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तालुक्यातील बोगस डॉक्टर मुन्नाभाईचा पर्दाफाश; ग्रामस्थांकडून पुरावे नष्ट


धारूर // धारूरच्या तालुका आरोग्य पथकाने गुरूवारी धारूर तालुक्यातील जहागिरमोहा येथे ही कारवाई केली. संबंधीत बोगस डॉक्टरवर धारूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरने घटनास्थळावरून पलायन केले. कुठलाही परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या मुन्नाभाईचा पर्दाफाश करण्यात आले आहे.

मोनोतोसे रॉय (रा.जहागिरमोहा ता.धारूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुन्नाभाईचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रॉय हा मागील सहा महिन्यांपासून जहागिरमोहा येथे वास्तव्यास आहे. येथेच एका खोलीत त्याने दवाखाना सुरू केला होता. रॉयकडे वैद्यकीय सेवा देण्याचा देण्याचा कसलाही परवाना नव्हता. तरीही तो राजरोसपणे गावात उपचार करून नागरिकांची आर्थिक लुट करत असे.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली. त्यांनी तात्काळ धारूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.शेकडे यांना आदेश देऊन पथक नियूक्त केले. या पथकात नायब तहसीलदार एन.टी.विटेकर, सहा.फौजदार आर.एल.राठोड, पोना वडमारे, आरोग्य विस्तार अधिकारी एन.एच.पटेकर, आरोग्य सहायक एस.डब्ल्यू मांडवे आदींचा समावेश होता. डीएचओ डॉ.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हे पथक गावात धडकले. सेवा देत असलेल्या खोलीत जावून तपासणी करीत असतानाच काही ग्रामस्थ तिथे आले. त्यांनी पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला. पथकाने समजुत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ जास्तच आक्रमक झाले. पथकाला खोलीतून बाहेर काढले. पथकाने हा विरोध झुगारून खोलीतील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर धारूर ठाणे गाठून फिर्याद दिली. भोगलवाडी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून रॉय विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

▪ ग्रामस्थांचा विरोध; महिला आघाडीवर
पथक डॉक्टरवर कारवाई करत असताना ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. अनेकांनी पथकाच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेतले. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तही यावेळी होता. मात्र महिला आघाडीवर असल्याने पथकाला माघार घ्यावी लागली. विशेष म्हणजे पथक आणि ग्रामस्थांचे बोलणे सुरू असतानाच रॉयने दवाखान्यातून पळ काढला.

▪ ग्रामस्थांकडून पुरावे नष्ट :

पथकाने रॉयच्या दवाखान्यातून काही कागदपत्रे जप्त करून मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ घेतले होते. याचवेळी काही ग्रामस्थांनी पथकावर धावून येत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले. तसेच कागदपत्रे फाडण्याबरोबरच मोबाईलमध्ये डाटा उडविला. त्यामुळे पुरावे नष्ट झाले. ग्रामस्थांपुढे पथकाला शरनागती पत्कारून परतावे लागले.

▪ आंबेवडगावातील डॉक्टर भितीने फरार :

जहागिरमोहा येथील कारवाई झाल्यानंतर पथक आंबेवडगाव येथे पोहचले. मात्र पथक येणार असल्याची माहिती या डॉक्टरला आगोदरच समजली असावी, म्हणून तो घर बंद करून पसार झाला होता. पथक त्याच्या घराला नोटीस चिटकवून परतले. दरम्यान, पाच वर्षापूर्वी याच गावात डॉ.विश्वास नामक मुन्नाभाईवर गुन्हा दाखल झाला होता.

▪ "आम्ही योग्य ती कारवाई केली" :
"जहागिरमोहा येथील तक्रार येताच पथकाने पाहणी केली. यामध्ये कसलीही परवानगी नसताना वैद्यकीय सेवा पुरविली जात असल्याचे निदर्शनास आल्याने एकावर गुन्हा दाखल केला आहे. कारवाई दरम्यान ग्रामस्थांनी अडथळे आणले. मात्र जमाव मोठा असल्याने आम्हाला काही करता आले नाही. तरीही आम्ही योग्य ती कारवाई केलेली आहे."
- डॉ.एस.डी.शेकडे, तालुका आरोग्य अधिकारी, धारूर