परळी // तालुक्यातील कवडगाव घोडा येथे शेतातील आखाड्यावर झोपलेला सालगडी सुदाम नामदेव देवकते (वय ६०, रा.कौडगाव घोडा, ता. परळी) यांचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. खुन्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता उलट देवकते यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करत अवघ्या २४ तासात या गुन्ह्याची उकल केली आणि खुन्याला बेड्या ठोकल्या. सुदाम देवकते यांच्या मुलीच्या प्रियकरानेच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
सुदाम हे गावातीलच माणिक भगवान कोळेकर यांच्याकडे वर्षभरपासून सालगडी म्हणून कामावर होते. २ मार्च रोजी भजन ऐकून शेतात परतल्यानंतर माणिकला सुदाम दिसला नाही. त्याच्या झोपण्याच्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसल्याने माणिकने आजबाजूच्या लोकांना बलवून सुदामचा शोध सुरु केला. तेंव्हा शेतातील विहिरीच्या कडेला सुदामचे बूट दिसले. त्यानंतर विहिरीत पहिले असता आतमध्ये सुदामचा मृतदेह दिसून आला. याबाबत माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वानपथक आणि फोरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, खुन्याने कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने प्रकरण किचकट झाले होते. प्रथमदर्शनी हा प्रकार चोरीचा असावा अशी शक्यता समोर आली होती. मात्र, आखाड्यावर कुठलीच वस्तू चोरीला गेली नसल्याने पोलिसांनी इतर दिशांनी तपासकार्य सुरु केले. दरम्यान, मयताच्या घटस्फोटीत मुलगी सविता (नाव बदलले आहे) हिचे गावातील अंकुश कोळेकर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून अंकुशला ताब्यात घेतले. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अंकुशने पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच सुदामचा खून केल्याची कबुली दिली.
▪ प्रेयसीचे लग्न जमल्याने बिथरला अंकुश :
घटस्फोटानंतर सविता दहा वर्षापासून माहेरीच राहत होती. सहा वर्षापूर्वी तिचे अंकुशसोबत अनैतिक संबंध जुळले. मात्र, काही दिवसांपूर्वी सुदामने सविताचे दुसरे लग्न शेजारच्या गावातील एका तरुणासोबत जमविले. लग्न जमल्यामुळे आपल्या संबंधातून मोकळे कर अशी विनंती सविताने अंकुशला केली. त्यामुळे विरहाच्या कल्पनेने अंकुश बिथरला होता. तुझ्या वडिलांचा काटा काढीन अशा धमक्या तो वारंवार सविताला देत असे. खुनाच्या दिवशी देखील त्याने फोनवरून तशी धमकी सविताला दिली होती. परंतु, तो नेहमीच असे बोलतो म्हणून तिने धमकीकडे दुर्लक्ष केले. सविताच्या भावी पतीला सुद्धा अंकुशने फोन करून धमकावले होते असे तपासात समोर आले आहे.
▪ शेतमालक कीर्तनला गेल्याची सांधली संधी :
२ मार्च रोजी सुदाम व शेतमालक माणिक शेतात मुक्कामी गेले होते. मात्र एकादशी असल्याने माणिक हे बाजूच्या वस्तीवर भजन ऐकण्यासाठी गेले. त्यामुळे शेतात सुदाम एकटेच झोपले असल्याची संधी साधून अंकुशने लाकडी दंडुक्याने त्यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किरकोळ शरीरयष्टीचे सुदाम बेशुद्ध पडले. त्यानंतर रक्त पाहून घाबरलेल्या अंकुशने त्यांना फरफटत नेऊन विहिरीत टाकले. सुदामने आत्महत्या केल्याचे भासावे यासाठी अंकुशने त्यांचे बूट आणून विहिरीजवळ ठेवले होते.
▪ मुलीच्या वर्तणुकीवरून आला संशय :
तपासादरम्यान पोलीस सुदामच्या घरी चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी सविताने आम्हाला कोणाबद्दलच संशय नाही आणि तक्रार देखील करायची नाही. तुमचेच काय अडले आहे? असा आकांडतांडव करत मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. तिचे हे अनपेक्षित वागणेच पोलीस तपासाचा केंद्रबिंदू ठरले. त्यामुळे अपर अधीक्षक बोऱ्हाडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती काढण्याकामी रवाना केले. गुप्त माहितीत अंकुश सोबतच्या तिच्या अनैतिक संबंधांची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिचे मोबाईल कॉल डिटेल्स काढले असता त्यात अंकुश सोबत तिचे सातत्याने बोलणे असल्याचे निष्पन्न झाले. खुनाच्या दिवशी देखील त्यांच्यात तीन वेळेस जास्त कालावधीचे बोलणे झाल्याचे उघड झाले आहे.
▪ अनैतिक संबंधामुळे दोन कुटुंब उध्वस्त :
सुदामच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आणि एक दहा वर्षाचा मुलगा आहे. सुदाम हेच घरातील एकमेव कर्ता पुरुष होते. तर, अंकुश हा देखील विवाहित आहे. त्याच्या आणि सविताच्या अनैतिक संबंधापायी ही दोन्ही कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.
▪ तपासकार्यातील कर्मचारी बक्षिसाने सन्मानित :
हा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले, माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, सहा. निरीक्षक राठोड, उपनिरीक्षक पुरी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. याप्रकरणी गोपनीय माहिती काढून तत्परतेने आरोपीस बेड्या ठोकल्याबद्दल पोलीस कर्मचारी रमेश सिरसाट, भास्कर केंद्रे, सचिन सानप, दिलीप गित्ते, विष्णू फड, अर्शद सय्यद यांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष अभिनंदन करून त्यांना बक्षिसाने सन्मानित केले.
▪ अजित बोऱ्हाडे यांच्या कौशल्यपूर्ण तपासाचे वर्षभरात दुसरे उदाहरण :
गतवर्षी जून महिन्यात परळी - अंबाजोगाई रोडवर रेल्वे पोलीसचे कर्मचारी नागनाथ मुंडे यांचा खून झाला होता. कुठलाही पुरावा हाती नसताना अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी केवळ मृतदेहा शेजारच्या टायरच्या खुणांवरून अवघ्या बारा तासात अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने खुनाचा छडा लावून दोन आरोपींना जेरबंद केले होते. वर्षभरातच त्यांच्या कुशल तपासकार्याची दुसऱ्यांदा प्रचीती आली. अतिशय नियोजनबद्ध कार्य आणि तपासकार्यात कोणतेही ‘लूप होल्स’ न ठेवणे ही बोऱ्हाडे यांची खासियत असल्याचे खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी सांगतात.
=======================
अधिक बातम्यांसाठी वाचा ‘विवेक सिंधु’
Social Plugin