Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

⚡ ब्रेकिंग ! ७ राज्यांतील पोलिसांना विविध गुन्ह्यांत हवे असलेले , अट्टल गुन्हेगार परळीत जेरबंद !


  पराळी // जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर आणि अपर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर व संभाजीनगर पोलिसांनी सात राज्यांतील पोलिसांना हवे असलेल्या कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. संभाजीनगर व शहर पोलिसांनी आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करीत आरोपीला जेरबंद केले .


संभाजीनगर व शहर पोलिसांनी आज केलेल्या मोठ्या कारवाईत पकडण्यात आलेले गुन्हेगार हे अट्टल स्वरूपाचे असून, ७ राज्यांतील पोलिसांना ते विविध गुन्ह्यांत हवे आहेत. त्यांच्यावर बाहेर राज्यात चोरी, फसवेगिरी, लुबाडने, चेनस्नॅकींगसारखे असंख्य गुन्हे आहेत. सदरील आरोपींना पकडण्यासाठी अनेकवेळा पोलिसांनी प्रयत्न केले होते, मात्र पोलिसांना गुंगारा देवून पळून जाण्यात त्यांना यश आले होते.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलिस प्रशासन अतिशय दक्ष असून, निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेले आणि पोलिसांना हवे असलेल्या गुन्हेगारांची शोधमोहीम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली अशा सात राज्यांतील पोलिसांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेला आरोपी जाहिर अब्बास शेकू अली (वय ३२) व त्याचा साथीदार लल्ला अब्बास शेकू अली (वय २५) वर्षे, रा.ईराणी गल्ली, परळी वैजनाथ यांना आज दि.२४ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर झोपडपट्टी परिसरात पाठलाग करून अटक करण्यात आली. त्यांच्यावर संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुरनं २१/२०१८ कलम ३५३, भादंवी व गुरनं २०७/२०१७ कलम ३०६, तसेच परळी शहर पोलिस स्टेशन येथे गुरनं ८५/१६ कलम ३०७ व ३८/१९ कलम ३९२ भादंवी नुसार गुन्हे यापूर्वीच दाखल करण्यात आलेले  आहेत.

आज मात्र सिनेस्टाईल पाठलाग करीत परळी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार, परळी शहरचे सपोनि.श्रीकांत डोंगरे पाटील, सपोनि.सलिम पठाण, डिबी पथकाचे प्रमुख पोहेकॉ.रमेश सिरसाट, मधुकर निर्मळ, व्यंकट भताने, रंगा राठोड, सविता दहिवाळ, दत्ता गित्ते, लाला बडे, गोविंद फड, अडेकर, मुंडे, भांगे यांच्यासह केंद्रीय राखीव दलाच्या पथकाच्या जवानांनी ही कारवाई केली. पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई असून, अनेक गुन्हेगारांवर बीड जिल्हा पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले.