दिल्ली // भाजपा कायम देशातील जनतेसोबत आहेत. देशातील जनतेला होत असलेल्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. मात्र इंधनाचे दर आमच्या हातात नाही, असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याबद्दल असमर्थतता दर्शवली. 'प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे. मात्र आज देशात काय सुरू आहे? पेट्रोल पंपांवर तोडफोड सुरू आहे. बसेस जाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,' असं म्हणत प्रसाद यांनी बंद दरम्यान सुरू असलेल्या हिंसक घटनांवर भाष्य केलं इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशभरात या बंदचा परिणाम दिसू लागल्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही, असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी हात वर केले.
रवीशंकर प्रसाद पत्रकारांशी संवाद साधताना बिहारच्या जेहनाबादमधील घटनेचा संदर्भ दिला. 'जेहनाबादमध्ये एक रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकल्यानं एका लहान मुलीचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष सध्या नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. त्यातूनच त्यांनी भारत बंदची हाक दिल्याचा टोला प्रसाद यांनी लगावला.
Social Plugin