Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दहावीला सलग तीन वेळा अनुत्तीर्ण झाल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर! म्हणत.. परळी ते दिल्ली प्रवास...करत उच्च अधिकारी झालेल्या 'हा' जिद्दीबाज कोण? आहे . तर वाचा ...



परळी //सतीश भिसे हा Çएलबी  अविअशन  होल्डिंग या तुर्किश कार्गो टर्मिनल कंपनी मध्ये प्रवासी सेवा कार्यकारी अधिकारी  म्हणून आज रुजू होतोय. खरतर प्रवासी सेवा कार्यकारी अधिकारी हे पद खूप काही मोठे नाही परंतु सतीश चा एकंदरीत प्रवास बघितला तर हे पद त्याच्यासाठी खूप मोठे आहे.

 बीड जिल्हयातील परळी तालुक्यात परळी- सोनपेठ रस्त्यावर साधारणतः २५०० ते ३००० हजार लोकसंख्या असलेले इंजेगाव हे सतीश चे मूळ गाव. आईवडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करून त्यांनी तिन्ही लेकरांना शिकवले. सतीश च्या कुटुंबामध्ये हा सर्वात मोठा मुलगा,आणि त्याला एक लहान भाऊ आणि एक बहीण. सतीश चे प्राथमिक शिक्षण इंजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्याने परळी हे तालुक्याचे ठिकाण निवडले.  परळीतील न्यू हायस्कूल या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करत सतीश ला अनेकदा पैशाची चनचन भासायची. परळीतील काही मुले शाळेत स्वतःच्या सायकल, मोटार सायकल वर यायची आणि हा गावाकडून आलेला मुलगा एकच पोशाख परत परत घालून शाळेत जायचा.हि बाब शाळेला शिक्षिका सौ. सविता आठरे मॅडम यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सतीश ला शाळेच्या पोशाखापासून ते शाळेच्या शुल्कापर्यंत मदत केली. सतीश कसाबसा इयत्ता दहावीला पोहचला परंतु दहावीला गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाला. पहिल्यांदा दहावीला अनुत्तीर्ण झाल्यावर सतीशने गावाकडे शेळ्या राखायला सुरुवात केली. दिवसभर शेळ्यामागे फिरणे आणि संध्याकाळी शेळ्या घरी घेऊन येणे हा त्याचा दिनक्रम. एकदिवस वडिलांनी सांगितले ‘तू फक्त अभ्यास कर मी पूरक परीक्षेचे शुल्क भरतो’ आणि सतीश परीक्षेच्या तयारीला लागला परंतु दुसर्यांदा अनुत्तीर्ण  झाला. वडिलांनी परत पूरक परीक्षेचे शुल्क भरले आणि सतीश तिसऱ्यांदा अनुत्तीर्ण झाला.मुलगा दहावीला तिसऱ्यांदा अनुत्तीर्ण होऊन हि त्याच्या वडिलांनी एक वाईट शब्दही तोंडातून काढला नाही उलट चौथ्यांदा त्याचे पूरक परीक्षेचे शुल्क भरले. एकीकडे  मुलाने ९० टक्के गुण मिळूनही त्याला शाबासकी न देणारे सुशिक्षित पालक मी बघितले आणि दुसरीकडे मुलगा तिसऱ्यांदा अनुत्तीर्ण होऊनही त्याला अभ्यासासाठी प्रोसाहित करणारे सतीश चे हे अशिक्षित वडील. दहावीला गणित या विषयामध्ये सलग तीन वेळा अनुत्तीर्ण झाल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर! या म्हणीप्रमाणे अखेर चौथ्यावेळेस गणित विषयामध्ये ८१ गुण घेऊन उत्तीर्ण झाला.
दहावीला उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणाचे कसे होणार ? हा गंभीर प्रश्न त्याच्या समोर होता. सतीश ला शिकवणारे आणि इंग्रजी या विषयाचा लळा लावणारे श्री.अमोल कांबळे सर यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी एन.सूर्यनारायण सरांच्या घरी राहण्याची सुविधा करून दिली.एन.सूर्यनारायण सरांच्या घरी राहत असताना सतीशने  भूषण कातकडे सर यांच्या शिकवणी केंद्रावर काम करून स्वतःचा इतर खर्च भागवला.सतीश बारावी ७२.०० टक्के गुणाने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बी.ए. साठी प्रवेश घेतला.काही दिवसांनी एन.सूर्यनारायण सर दिल्ली येथे त्यांच्या मुलाकडे स्थलांतरित झाले आणि सतीश सुद्धा सरांसोबत दिल्ली ला पोहचला. दिल्लीत राहत असताना एन.सूर्यनारायण सरांचे चिरंजीव श्री. सचिन सूरी आणि त्यांची पत्नी यांच्या मदतीने सतीशला एका मॉल नोकरी मिळाली. मॉल मध्ये काम करत त्याने बी.ए.ची  पदवी ६६.०० गुण घेऊन मिळवली. सतीश चे एम.ए. इंग्रजी मध्ये प्रथम वर्ष पूर्ण केले आणि तो आज Çएलबी  अविअशन  होल्डिंग या तुर्किश कार्गो टर्मिनल कंपनी मध्ये प्रवासी सेवा कार्यकारी अधिकारी  म्हणून रुजू होतोय.जी मुले आईवडिलांबरोबरच,घरच्या परिस्थितीला दोष देत शिक्षणाकडे पाठ फिरवतात,  त्यांनी दहावीला  तीन वेळा अनुत्तीर्ण होऊन, समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करत आज दिल्ली सारख्या मेट्रो शहरामध्ये चांगल्या पदाची नोकरी मिळवणाऱ्या सतीश चा आदर्श घेतला पाहिजे.


@ अन्वर शेख
उपप्राचार्य
न्यू होरायझन पब्लिक स्कूल
न्यू पनवेल
९८८१०४५२०९