▪ एका गाईचा पाडला फडशा; स्थानिकात भीतीचे वातावरण
अंबाजोगाई शेजारील मुकुंदराज, बुट्टेनाथ, वाघदरा, डोंगर तुकाई भागात घनदाट झाडी असल्याने येथे वारंवार बिबट्याचा वावर पहावयास मिळत आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक जनावरांचा फडशा पाडला आहे. बुट्टेनाथ पासून ३ किमी अंतरावर कुरणवाडी शिवारात गट क्र. ७३४ मध्ये ॲड. इस्माईल रहेमान चौधरी यांची शेती आहे. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःच्या मालकीची चार वर्षीय गाय शेतात बांधली होती. रात्रीच्या वेळी शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत बिबट्याने त्या गाईवर हल्ला चढविला आणि तिला ठार केले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर दुपारी डॉ. केंद्रे यांनी सदरील गाईचे शवविच्छेदन केले. बुधवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा करणार असल्याचे समजते.
▪ आठवड्यापासून बिबट्या ठाण मांडून :
दरम्यान, आठ दिवसापूर्वीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दर्शन देऊन बिबट्या अंतर्धान पावला होता. मात्र, याच परिसरात त्याचा वावर असल्याचे संकेत वारंवार कर्मचाऱ्यांना मिळत होते.त्यामुळे अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलेले नाही.
▪ तीन महिन्यात पाच जनावरांचा बळी
यापूर्वी एक-दोन वर्षाला बुट्टेनाथ परिसराकडे भटकत येणाऱ्या बिबट्याचा वावर मागील तीन महिन्यात वाढला आहे. अवघ्या तीन महिन्यात बिबट्याने पाच जनावरांना ठार केले आहे. नोव्हेंबरमध्ये उस्मान मुन्निवाले आणि शेख नसीर यांच्या दोन वासरांचा फडशा पाडला होता. त्यांनतर डिसेंबरमध्ये बाबू जुम्मा गवळी यांची दोन जनावरे बिबट्याने फस्त केली तर सोमवारी रात्री ॲड. इस्माईल चौधरी यांची गाय ठार मारली. हल्ल्याच्या वाढलेल्या घटनांमुळे आता या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येत असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी सांगितले.
===========================
अधिक बातम्यांसाठी वाचा‘विवेक सिंधु’
Social Plugin