बीड // जिल्हा कारागृहात लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. प्रकाश विश्वनाथ झिंजुर्डे (रा. नाळवंडी नाका) असे या कैद्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार करुन त्याला पुन्हा कारागृहात आणण्यात आले. कैद्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे तो जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. बुधवारी रात्री संरक्षण भिंतीवरील काचा खाली पडल्या होत्या. याच काचाने त्याने हातावरच जखमा करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वेळीच सुरक्षा रक्षकांनी पाहिल्याने त्याला तात्काळ थांबवित जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात बंदीस्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी दिली. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात विश्वनाथ विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
Social Plugin